हिमाचलप्रदेश विधानसभेचे निकाल पाहता काँग्रेसचा विजय निश्चित झाला आहे.  काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे तर सुरुवातीला आघाडी घेणारा भारतीय जनता पक्ष पिछाडीवर पडला आहे.  हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल हमीरपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार नरिंदर ठाकूर यांचा ९५०० मतांच्या फरकाने पराभव केला. २००७ मध्ये धुमल यांनी बामसान मतदारसंघातून तीस हजार मतांनी विजय मिळवला होता. पण मतदारसंघ फेररचनेमध्ये त्यांचा मतदारसंघ गायब झाल्याने त्यांनी जवळच्या हमीरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली.
या निवडणुकांसाठी भरपुर मेहनत घेतल्याचे वीरभद्र सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षातर्फे हिमाचलप्रदेशचा मुख्यमंत्री सोनिया गांधीचं ठरवतील असंही ते पुढे म्हणाले. “ह्या निवडणुकीत जिंकण्यासाठी काही मुद्दे मी नमुद केले होते आणि त्यावर मेहनत घेतली. मुख्यमंत्री नेमण्याचे सर्वाधिकार हे सोनिया गांधींकडेचं आहेत” अशी प्रतिक्रिया वीरभद्र सिंग यांनी आज(गुरुवार) पत्रकारांना दिली. हिमाचलप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपच्या हातून सत्ता काँग्रेसकडे गेल्याने भाजपला राजकीय धक्का बसला आहे. गुजरातच्या तुलनेत लहान राज्य असलेल्या हिमाचलप्रदेशमध्ये कांगरा जिल्हयात सर्वाधिक १५ जागा आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचा निकाल सत्तास्थापनेत निर्णायक ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते.