दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आता आणखी एका वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठातील वसतीगृहात मणिपूरच्या एका संशोधक विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जे. आर. फिलेमोन राजा असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यातील रहिवासी आहे. पश्चिम आशिया या विषयावर तो जेएनयूत पीएच.डी करत होता.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिलेमोन राजा हा ब्रह्मपुत्रा वसतीगृहातील १७१ क्रमांकाच्या खोलीत राहत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो कोणाला दिसला नव्हता. मंगळवारी रात्री त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्याच्या शेजारच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांना बोलावून दरवाजा तोडला असता आत फिलेमोनचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह एम्स रूग्णालयात नेण्यात आला. पोलीस तपास करत आहेत. फिलोमोनच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. हा घातपात होता की आत्महत्या याबाबत विद्यापीठात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून जेएनयूतील नजीब नावाचा विद्यार्थी गायब आहे. त्यासाठी विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात आंदोलन ही केले. परंतु अद्याप त्याचा शोध लागू शकलेला नाही. त्यातच हा मृतदेह सापडल्याने विद्यापीठात चर्चेला ऊत आला आहे.