शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले लोकदलाचे नेते अजय चौताला यांची शिक्षा स्थगित करण्यास तसेच जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या टप्प्यावर तुमच्या अर्जाचा विचार करू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
तसेच वैद्यकीय आधारावर अंतरिम जामिनासाठी किंवा पॅरोलसाठी अर्ज करू शकता, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी जो निर्णय दिला आहे त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने साक्षीपुरावे व्यवस्थित तपासले नसल्याचे सांगत चौताला यांनी शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. तसेच रुग्णालयात दाखल होण्याची अत्यंत गरज असल्याचा युक्तिवाद चौताला यांच्या वकिलांनी केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने ५ मार्च रोजी शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र अजय व इतर तिघांना १० वर्षे कैद सुनावली आहे.