मुस्लिम धर्मियांत असलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केला असून, त्यासंबंधित सर्व याचिकांवर ११ मेपासून सुनावणी होणार आहे.

https://twitter.com/ANI_news/status/847371720549834752

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठासमोर तिहेरी तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला प्रकरणी येणाऱ्या याचिकांवर घटनापीठाकडे सुनावणी होईल. ही सुनावणी ११ मेपासून घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठाने सांगितले.

तोंडी तलाक, निकाह हलाला आणि मुस्लिमांमधील बहुपत्नीत्वाची प्रथा या सगळ्यांबद्दल सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी म्हटले होते. मुस्लिम कायद्याच्या आधारे करण्यात येणाऱ्या तलाकचा विचार करण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. ‘हे प्रकरण मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आहे,’ असे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर, न्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले होते. ‘या प्रकरणाचा निकाल इतर प्रकरणांवरही परिणाम करु शकतो. या प्रकरणावेळी समान नागरी कायद्यावर चर्चा होणार नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालय कायदेशीर बाजूंच्या आधारावर निर्णय देणार आहे. ‘११ मे पर्यंत एक आदेश काढून तोंडी तलाकच्या वैधतेसंबंधीच्या सर्व याचिकांचा निपटारा करण्यात येईल. या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी एकत्र येऊन या मुद्याला अंतिम स्वरुप द्यावे, असेही न्यायालयाने म्हटले होते. याआधी केंद्र सरकारने आपल्या याचिकेत मुस्लिमांचे लिंग गुणोत्तर आणि सांप्रदायिकतेचा हवाला देऊन तोंडी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाचा विरोध केला होता. ‘लैंगिक समानता आणि महिलांचा मान सन्मान या प्रकरणी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून महिलांना वंचित ठेवले जाऊ शकत नाही,’ असे केंद्र सरकारने म्हटले होते.