परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महाश्वेता देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मात्र, ट्विटरवरुन शोक व्यक्त करताना त्यांच्याकडून चुकी झाल्यामुळे सुषमा यांना नेटीझम्सच्या टीकेला सामोरे जावे लागले. महाश्वेता देवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी ट्विट केले होते.या ट्विटमध्ये त्यांनी दोन पुस्तकांचा उल्लेख केला होता.Pratham Pratishruti आणि Bakul Katha या दोन पुस्तकांचा सुषमा यांनी ट्विटमध्ये उल्लेख केला होता. ही पुस्तके महाश्वेता देवी यांनी नव्हे, तर आशापुर्णा देवी यांनी लिहली होती. ट्विटवर केलेली ही चूक लक्षात आल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट काढून टाकले. मात्र, तोपर्यंत अनेकांनी हे ट्विट पाहिले होते. सामाजिक कार्यकर्त्यां आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी (९०) यांचे गुरुवारी कोलकाता येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वैयक्तिक मार्गदर्शक गमावल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाश्वेता देवी यांच्या लेखणीत कमालीची शक्ती होती. त्यांच्या लेखणीत करुणा, समता आणि न्यायाचा आवाज होता. त्यांच्या जाण्याने अतिशय दु:ख झाले असल्याचे ट्विटरवर म्हटले होते.