जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केलेल्या भाषणात दहशतवादाची निर्मिती करणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुहाने एकटे पाडले पाहिजे, असे आवाहन केले. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आमसभेत भारतावर केलेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावत काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात, असेही त्यांनी शरीफ यांना सुनावले. यावेळी त्यांनी बलुचिस्तानमधील नागरिकांवर पाकिस्तानी सरकारकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांचा मुद्दाही उपस्थित केला.
सुषमा स्वराज म्हणाल्या, दहशतवादी हे मानवी अधिकारांवर हल्ला करतात. त्यांच्यामुळे अनेक निरपराध लोकांना नाहक आपल्या प्राणांना मुकावे लागते. त्यामुळे या विषयाकडे त्या दृष्टीनेच बघितले पाहिजे. यासाठी दहशतवादाची निर्मिती करणाऱ्या, दहशतवाद पोसणाऱ्या, दहशतवादी निर्यात करणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुहाने एकटे पाडले पाहिजे.

भारताने पाकिस्तानला ईदच्या शुभेच्छा दिल्या. क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची परतफेड त्यांनी पठाणकोट आणि उरीच्या वेदना देऊन केली. असे सुषमा यावेळी म्हणाल्या. बहादुर अली हा आमच्याकडे पाकविरोधातील लिखीत पुरावा असल्याचेही सुषमांनी यावेळी सांगितले.
दरम्यान भारताच्या विकासावर भाष्यकरताना त्यांनी सरकारने सुरु केलेल्या ‘जन धन योजना’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा दाखला देत भारत आर्थिक विकासाच्या मार्गावर प्रगती करत असल्याचे त्या म्हणाल्या.