संयुक्त राष्ट्र संघातील सुषमा स्वराज यांचे भाषण अहंकारी होते, अशी टीका चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केली आहे. काही वर्षांमध्ये झालेल्या आर्थिक विकासामुळे भारताकडून पाकिस्तानला कमी लेखले जात असल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याची कबुलीही या वृत्तपत्राने दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानवर तोफ डागली होती. स्वराज यांचे हे भाषण सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले होते.

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानची कानउघाडणी केल्यामुळे चीन संतप्त झाला आहे. ‘पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे. मात्र दहशतवादाचे समर्थन करणे पाकिस्तानची राष्ट्रीय भूमिका आहे का? दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्तानला काय मिळणार? आर्थिक मदत की सन्मान?’, अशा शब्दांमध्ये ‘ग्लोबल टाईम्स’ने चीनचा मित्र असलेल्या पाकिस्तानचे समर्थन केले. यासाठी या वृत्तपत्राने ‘इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन्स,’ या मथळ्याखाली संपादकीय लेख प्रसिद्ध केला आहे.

‘गेल्या काही वर्षांमधील आर्थिक विकास आणि परराष्ट्र संबंध यांच्या जोरावर भारताकडून पाकिस्तानला कस्पटासमान लेखले जात आहे. भारताने चीनलादेखील अहंकार दाखवला आहे. पाकिस्तान घाबरुन अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दबावाला बळी पडेल, असे भारताला वाटते. भारताने मतभेदांना खतपाणी घालण्याऐवजी चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध राखायला हवेत आणि पाकिस्तानचा आदर करायला हवा,’ असा सल्लादेखील या वृत्तपत्राने दिला आहे.

‘ग्लोबल टाईम्स’ने संपादकीय लेखात ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचाही उल्लेख केला आहे. अजहरचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या प्रयत्नांना चीनने अनेकदा खोडा घातला आहे. याबद्दलही वृत्तपत्राने भाष्य केले आहे. ‘त्या (सुषमा स्वराज) भारतीय प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवून अजहरच्या मुद्यावरुन चीनला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत होत्या,’ असे लेखात नमूद करण्यात आले आहे. शनिवारी संयुक्त राष्ट्र संघात बोलताना स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. मात्र ७० वर्षांमध्ये भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना उभारण्यात धन्यता मानली,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.