निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मंगळवारी भ्रष्टाचारविरोधी प्रकरणात अटक करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या तत्कालीन गुजरात सरकारशी त्यांचे संघर्षांचे संबंध होते.
वेलस्पन या खासगी कंपनीकडून २९ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शर्मा यांना मंगळवारी सकाळी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली. याबाबत तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला ही रक्कम शर्मा यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा करण्यात आली व नंतर ती त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली, असे भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्थेचे आशिष भाटिया यांनी सांगितले. कच्छचे जिल्हाधिकारी असताना कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचे हे प्रकरण असून, प्रदीप शर्मा व त्यांचे आयपीएस असलेले बंधू कुलदीप शर्मा हे मोदी यांच्या काळात सेवेत असताना त्यांच्यातही संघर्ष होता. शर्मा यांना नंतर निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपचे आताचे अध्यक्ष व तेव्हाचे गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून एका महिलेवर लक्ष ठेवल्याच्या स्नूपगेट प्रकरणात ज्या टेप्स प्रसारित करण्यात आल्या होत्या त्यातही त्यांचे नाव होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११, १३ (१) (डी), १३ (२) अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण २००४ मधील आहे.