जवानांना मिळणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जाविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तक्रार करणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मृतदेहाचा फोटो दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल आवाज उठवल्याची शिक्षा तेज बहादूर यांना मिळाली, असाही संदेशदेखील सोशल मीडियावर फिरताना दिसतो आहे. मात्र हा फोटो खोटा असून तेज बहादूर यादव जिवंत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. सीमा सुरक्षा दलासोबतच तेज बहादूर यांच्या पत्नीनेदेखील ते जिवंत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील अनेक फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन तेज बहादूरचा मृत्यू झाल्याचा फोटो व्हायरल होतो आहे.

पाकिस्तानमधीन अनेक फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन सध्या दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यातील एका फोटोत तेज बहादूर यादव जवानांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची तक्रार करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तेज बहादूर यादव मृतावस्थेत दिसत आहेत. या फोटोत तेज बहादूर यादव यांचा अर्धा चेहरा झाकण्यात आला आहे. यासोबतच या फोटोत त्यांच्या नाकातून रक्त येतानाही दिसत आहे. पाकिस्तानमधून व्हायरल करण्यात आलेल्या या फोटोची भारतातही मोठी चर्चा सुरू आहे. मात्र सीमा सुरक्षा दलाने तेज बहादूर यादव यांच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तेज बहादूर यादव तंदरुस्त असून जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.

सीमा सुरक्षा दलाचे जवान असलेले तेज बहादूर यादव त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. या व्हिडिओमधून तेज बहादूर यादव यांनी जवानांना मिळत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाची तक्रार केली होती. वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याने जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न खावे लागत असल्याची तक्रार तेज बहादूर यादव यांनी केली होती. यानंतर तेज बहादूर यादव यांची चौकशीदेखील करण्यात आली होती.

तेज बहादूर यादव यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने तेज बहादूर यादव बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. निकृष्ट दर्जाचे अन्न, अधिकाऱ्यांकडून जवानांना मिळणारी वागणूक आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवल्यामुळे तेज बहादूर यादव यांना धमकावले जात असून त्यांना त्रासही देण्यात येत असल्याचा आरोप तेज बहादूर यादव यांच्या पत्नीने केला होता. तेज बहादूर यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोपदेखील त्यांच्या पत्नीने केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने तेज बहादूर यादव यांच्या पत्नीचे आरोप फेटाळले होते. तेज बहादूर यादव सुरक्षित असून ते जम्मूमध्ये कर्तव्य बजावत आहेत, असे सीमा सुरक्षा दलाने म्हटले होते.