देशाच्या उत्तरेकडील भागात स्त्रियांवर प्रेम करण्याची संस्कृतीच नाही, त्यामुळे उत्तर भारतातील लोकांच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याची खरी गरज आहे, असे मत प्रसिद्ध गायक व गीतकार रब्बी शेरगिल   यांनी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर भाष्य करताना व्यक्त केले आहे.शेरगिल म्हणाले, की उत्तरेकडे स्त्रियांवर प्रेम करण्याची संस्कृती नाही, त्यांना बाहेर पडताना दोनदा विचार करावा लागतो. गोवा आणि महाराष्ट्रातील संस्कृती मात्र स्त्रियांवर प्रेम करणारी आहे. काही ऐतिहासिक कारणांमुळे उत्तरेकडे स्त्रियांचा द्वेष केला जातो. दिल्ली व आजूबाजूच्या भागात स्त्रियांवर प्रेम करण्याची संस्कृतीच नाही, या भागाने अनेक परकीय आक्रमणे झेलली. त्यात स्त्रिया लुटल्या गेल्या, कदाचित त्यातून ही वृत्ती वाढीस लागली असावी. स्त्रिया हेच आपल्या ऱ्हासाचे खरे कारण आहे असे तेथील लोकांना नंतर वाटू लागले. ती कारणे आता नष्ट झाली आहेत, त्यामुळे उत्तरेतील लोकांना स्त्रियांवर प्रेम करायला शिकवण्याची गरज आहे, त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत.