लाख लाख कोटींचे आकडे.. हजारोंची तरतूद.. विविध घोषणा.. असं स्वरूप असलेल्या अर्थसंकल्पाशी आपला काय संबंध, असा प्रश्न अनेक कुटुंबांना पडत असतो. अमूक वाढणार, अमूक कमी होणार म्हणजे नेमकं काय होणार, हे आपल्यापर्यंत पोहोचायला नवीन आर्थिक वर्षच उजडावं लागतं. पण प्रत्येक अर्थसंकल्पासोबत आपल्या कुटुंबाचं ‘बजेट’ही वरखाली होत रहातं. यंदाच्या अर्थसंकल्पाचा तुमच्या घरातल्या बजेटवर कसा परिणाम होईल, हे सांगण्याचा हा प्रयत्न..

*मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूक करमुक्त. मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही कर्जसुविधा.

*पेसमेकर्स उपकरणांना करातून सूट, रुग्णवाहिकांच्या अबकारी शुल्कात निम्मी कपात, रुग्णवाहिकांच्या वापरावरील सेवाशुल्क रद्द झाल्यामुळे उपचार सुविधा स्वस्त होतील.

*मायक्रोवेव्ह ओव्हन, एलईडी दिवे, सोलर वॉटर हीटर, फ्रीज, अशा घरगुती उपकरणांशी संबंधित शुल्कात कपात झाल्यामुळे त्यांच्या किमती खाली उतरतील.
एकीकडे सेवाशुल्कातील दीड टक्क्यांच्या वाढीमुळे मोबाइलचं बिल काहीसं वाढेल. तर दुसरीकडे परदेशी कंपन्यांच्या मोबाइलसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. अशा परिस्थितीत देशांतर्गत कंपन्यांचे स्वस्त मोबाइल ‘बजेट’मध्ये बसतील.

*सेवाशुल्कातील वाढ केबल, डीटीएच, सिनेमा, इंटरनेट या सगळय़ांच्या किमती वाढवणार आहे. एकूणच मनोरंजनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. पण देशी कंपन्यांचे एलईडी टीव्ही स्वस्त होतील, हे उत्तम. दुसरीकडे, लॅपटॉप मात्र जरा महाग होईल.

*हवाबंद डब्यांतील फळे, भाज्या बनवण्याच्या प्रक्रियांना सेवाकरातून वगळल्याने अशी फळे, भाज्या स्वस्त होणार आहेत.

*सेवाशुल्क १४ टक्क्यांवर गेल्यामुळे हॉटेलातील खाणे, राहणे, हवाई प्रवास महाग होणार. त्यामुळे उन्हाळी सुटीत फिरायला जाणं खिसाजड होईल. पण वस्तुसंग्रहालय, अ‍ॅम्युझमेंट पार्क, प्राणिसंग्रहालय, राष्ट्रीय उद्यानांना सेवाशुल्कातून वगळल्याने तेथील फेरफटका स्वस्त होईल.

*ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली आणण्यासाठी ‘ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी’ स्थापण्यात येणार आहे. शिवाय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विविध विमा योजनांचा लाभही ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. दारिद्रय़रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना उपचार सुविधा आणि शारीरिक आधार उपकरणे पुरवण्यासाठी नवीन योजना आणली आहे.

*वित्तीय व्यवस्थापन, कुरियर, लाँड्री, ब्यूटीपार्लर, शेअर दलाली, विमा, व्यायामशाळा अशा सेवांसाठी अधिक झळ सोसावी लागेल.

*प्लास्टिकच्या पिशव्या, बॅगा महाग होतील. तर चपला, बूट, चामडय़ाच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.

*धूम्रपान करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा
सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सिगारेटसह सर्व तंबाखूजन्य पदार्थाच्या अबकारी शुल्कात वाढ केली आहे. आकारमानानुसार सिगारेटवरील अबकारी शुल्कात १५ ते २५ टक्के वाढ करण्यात आल्याने सिगारेटचे दर वाढणार आहेत. याशिवाय सुटय़ा तंबाखूवरील अबकारी शुल्क ६० रुपये किलोवरून ७० रुपये किलो करण्यात आले आहे. गुटखा आणि पानमसालाही आता आणखी महाग होईल.