उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष महाआघाडी करणार नसल्याचे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी तयार करतील अशी चर्चा होती. या चर्चेला समाजवादी पक्षाने पूर्णविराम दिला असून आम्ही केवळ काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी पक्षातर्फे प्रसिद्धिपत्रक जाहीर करुन आपला निर्णय सांगितला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष ३०० जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित १०३ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आम्ही केवळ काँग्रेससोबत असून राष्ट्रीय लोक दलासोबत जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय लोक दलासोबत कुठल्याही प्रकारची आमची बोलणी झाली नसल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार आहेत. आम्ही पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. या टप्प्यातील काँग्रेसच्या उमेदवारांची नावे निश्चित होणे अद्याप बाकी असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसचे नेते त्यांच्या उमेदवारांची नावे निश्चित करतील असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची यादी मुख्यमंत्री अखिलेश यादव जाहीर करतील असे ते म्हणाले. समाजवादी पक्षातील नेत्यांसोबत सहा तास चर्चा केल्यानंतर अखिलेश यादव यांनी महाआघाडी न करण्याचा निर्णय घेतला. अखिलेश यादव यांनी ठरवल्यापेक्षा जास्त जागा राष्ट्रीय लोक दलाने मागितल्यामुळे ही महाआघाडी अस्तित्वात आली नाही असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेससोबत निवडणूक लढविल्यास आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास नंदा यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असतो आम्ही तो लवकरच प्रसिद्ध करणार आहोत असे ते म्हणाले.  आम्हाला मनासारख्या जागा न मिळाल्यामुळे ही महाआघाडी होऊ शकली नाही असे राष्ट्रीय लोक दलाचे प्रवक्ते अनिल दुबेंनी इंडियन एक्सप्रेसला म्हटले. आरएलडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा होती. काँग्रेसने त्यांना २० जागांचा प्रस्ताव दिला होता. आरएलडीचे प्रमुख अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांनी हा प्रस्ताव पसंत पडला नाही. आपण ३० जागांच्या खाली काही कमी स्वीकारणार नाही असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. जर काँग्रेसला त्यांच्या १०३ जागांपैकी काही जागा आरएलडीला देण्याची इच्छा असेल तर तो त्यांचा निर्णय असेल असे नंदा यांनी म्हटले. २०१२ च्या निवडणुकीमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमधून आरएलडीने ९ जागा जिंकल्या होत्या.