पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम जनसमुदायात भाजपची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशातील आपल्या १२०० शाळांमध्ये जवळजवळ ७००० मुसलमान विद्यार्थी शिकत असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला. दोन वर्षांपूर्वी केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना झाल्यानंतर मुसलमान विद्यार्थ्यांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. श्लोकांचे पठण आणि भोजनापूर्वीचा मंत्रोच्चार अशा संघाच्या सर्व नियमांचे हे विद्यार्थी पालन करत असल्याचा दावा ‘आरएसएस’ने केला आहे. तसेच ते अभ्यासातदेखील चांगले असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
मुसलमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या-आपल्या शाळेत खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभ्यासात श्रेष्ठत्व सिध्द केल्याचा दावा सरस्‍वती शिशु मंदिर आणि सरस्‍वती विद्या मंदिरने केला आहे. शाळेतील अनेक मुसलमान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील तसेच युवा राष्ट्रमंडल खेळांमध्ये पदके प्राप्त केल्याचे विद्या भारतीचे चिंतामणी सिंग म्हणाले.
हे आकडे संघाविरुद्धच्या प्रचाराला खोटे ठरवत असल्याचे आरएसएसचे म्हणणे आहे. या शाळांमधील दिवसाची सुरुवात ही सूर्यनमस्कार आणि वंदेमातरमच्या गायनाने होते. मुसलमान विद्यार्थी शाळेतील अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच एकमेकांशी मिळून-मिसळून राहात असल्याचे सिंग म्हणाले. बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये ४,६७२ विद्यार्थी आणि २,२१८ विद्यार्थिनी शिकत आहेत. विद्याभारतीने अलीकडेच ८ मुसलमान शिक्षकांची नेमणूक केली आहे.