अमेरिकेतील टेक्सासमध्ये वॉलमार्टबाहेर एका ट्रॅक्टरमध्ये आठ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी तस्करीचा हा प्रकार असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये वॉलमार्टबाहेर एक ट्रॅक्टर- ट्रेलर थांबला होता. शनिवारी रात्री उशीरा ट्रॅक्टरमधील एक व्यक्ती वॉलमार्टमध्ये गेला. त्याने वॉलमार्टमधील कर्मचाऱ्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. कर्मचाऱ्याला हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॅक्टर- ट्रेक्टरमध्ये सुमारे ४० जण होते. यातील आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३० जणांची प्रकृती खालावली होती. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रेलरमधील एसी बंद होता. सॅन आन्तिनोमधील तापमान शनिवारी ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उष्माघाताने या सर्वांची प्रकृती खालावली असावी आणि यात आठ जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मानवी तस्करीचा हा प्रकार असून या घटनेचा तपास सुरु आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रेलर चालकाला अटक केली असून अद्याप त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ट्रॅक्टर-ट्रेलरमधील सर्व जण २० ते ३० वयोगटातील होते असे सांगितले जाते.