उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातासंदर्भात एक नवीन बाब उजेडात आली आहे. उत्कल एक्स्प्रेसचा अपघात होण्यापूर्वी खतौली स्थानकाच्या स्टेशन मास्तरांकडून धोक्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, इतर रेल्वे गाड्यांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि हा अपघात घडला.

उत्कल एक्स्प्रेसचा अपघात होण्यापूर्वी खतौलीचे स्टेशन मास्तर प्रकाश सिंह आणि उत्तर रेल्वेच्या विभागीय नियंत्रक यांच्यात झालेल्या कथित संभाषणाच्या क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. उत्कल एक्स्प्रेसचा अपघात होण्याच्या काही वेळापूर्वीच गँगमन्सकडून रूळाच्या दुरूस्तीसाठी ब्लॉक देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, रेल्वे वाहतूक कक्षाने ही मागणी फेटाळून लावली होती. रेल्वेचे सुरक्षा आयुक्त शैलेश कुमार पाठक यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रूळांच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या पीडब्ल्यूआय अधिकाऱ्याने अपघातापूर्वी खतौलीजवळील रूळाच्या दुरूस्तीची परवानगी मागितली होती. त्यासाठी या मार्गावरील सर्व गाड्या २० मिनिटांसाठी थांबवून ठेवल्या जाव्यात. जेणेकरून रूळाचा खराब झालेला भाग बदलता येईल, असे या अधिकाऱ्याने स्टेशन मास्तरांना सांगितले होते. यासाठी त्याने स्टेशन मास्तरांना लेखी विनंतीही केली होती, असे शैलेश कुमार यांनी सांगितले.

मुस्लिम बांधव मदतीला धावले नसते तर आम्ही मेलो असतो, जखमी साधूंचा दावा

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खतौली स्थानकातील एका कर्मचाऱ्याने हा स्टेशन मास्तरांचाच आवाज असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आहे. यामध्ये प्रकाश सिंह समोरच्या अधिकाऱ्याला पीआयडब्ल्यू २० मिनिटांचा ब्लॉक मागत असल्याचे सांगत आहेत. त्यावर समोरच्या अधिकाऱ्याने, हा कोणता ब्लॉक आहे?, अशी विचारणा केली. ब्लॉक घेतला तर मुख्य आणि उप रेल्वेमार्ग बंद होतील. अनेक एक्स्प्रेस गाड्या मार्गावर असताना ब्लॉक कसा घेता येईल, असा प्रतिप्रश्न समोरच्या अधिकाऱ्याने प्रकाश सिंह यांना केला. मात्र, प्रकाश सिंह यांनी निदान १५ मिनिटांचा ब्लॉक द्यावा, असेही सांगून पाहिले. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने आता खूप गाड्या असल्याने ब्लॉक देता येणार नाही, असे सांगत प्रकाश सिंह यांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर काही वेळातच खतौली येथे उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रूळावरून खाली घसरले. या अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

आले किती, गेले किती..