उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करणार असे दिसते. पदभार स्वीकारताच आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना १५ दिवसात संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यावर भर दिला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

रविवारी योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. योगी आदित्यनाथ पदभार स्वीकारल्यावर लोकभवनमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत योगी आदित्यनाथांनी सर्व मंत्र्यांना संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. वार्षिक उत्पन्न, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील आता मंत्र्यांना द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर योगी आदित्यनाथ यांनी जारी केलेला हा पहिला आदेश आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच सर्व मंत्र्यांचा संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. योगी आदित्यनाथांनीही या बाबतीत मोदींचेच अनुकरण केले असे दिसते.

जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यावर आमचा भर राहिल असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचार हद्दपार करण्यास सरकार प्राधान्य देईल. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी आवश्यक पावले उचलली जातील असेही ते म्हणालेत. गेल्या १५ वर्षात भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे उत्तरप्रदेशचा विकास झाला नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास या मंत्रानुसारच राज्याचा कारभार चालेल असे वचनही त्यांनी दिले. समाजातील प्रत्येक घटकाच्या दृष्टीने आम्ही पावले उचलू. यात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे.