कुख्यात गुंड छोटा राजनच्या टोळीतील शार्प शूटर खान मुबारक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने लखनौमधून खान मुबारकला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाला खान मुबारक लखनौमधील पीआयजी भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानुसार शनिवारी पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवत खान मुबारकला बेड्या ठोकल्या. खान मुबारक हा छोटा राजनचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखळा जातो. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. छोटा राजनविरोधात काम करणाऱ्या टोळ्यांना संपवण्यात खान मुबारकचा हात होता. खान मुबारक हा झफर सुपारीचा भाऊ आहे. झफर सुपारी हा दाऊद इब्राहिमचा कट्टर विरोधक होता. छोटा राजनच्या टोळीत शार्प शूटरची भरती करण्याचे काम झफरकडे होते.

झफर सुपारीच्या इशाऱ्यावरुन खान मुबारक बॉलीवूडमधील एका सेलिब्रिटीच्या हत्येचा कट आखत होता. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आल्याने हा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. खान मुबारक कोणाची हत्या करणार होता आणि हत्येचे नेमके कारण काय असावे हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या खान मुबारकला अज्ञातस्थळी नेण्यात आले असून तिथे त्याची कसून चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. बबलू श्रीवास्तव आणि झफर सुपारी या दोघांकडे शार्प शूटरची भरती करण्याचे काम होते. हे दोघेही पूर्वी शार्प शूटर म्हणूनच छोटा राजनसाठी काम करत होते. झफर सुपारीच्या भावाला अटक झाल्याने छोटा राजन टोळीला हा मोठा हादरा असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, छोटा राजन तुरुंगात असला तरी त्याची टोळी सक्रीय असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. छोटा राजनच्या नावावर खंडणी, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि हत्या असे एकूण ८५ गुन्हे आहेत. २५ ऑक्टोबर २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला भारताकडे सोपवण्यात आले होते.