अमेरिकी राजदूतांना साऊथ ब्लॉकमध्ये पाचारण
पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमाने विकण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयाबद्दल भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली आहे.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांना साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात बोलावले. अमेरिका पाकिस्तानला देत असलेली लष्करी मदत भारतविरोधी कारवायांसाठी वापरली जाऊ शकते, याबाबत भारताला वाटणारी शंका जयशंकर यांनी ४५ मिनिटांच्या बैठकीत त्यांना सांगितली
अशा प्रकारच्या लष्करी मदतीमुळे पाकिस्तानची धिटाई वाढेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या निर्णयाबद्दल आपली ‘निराशा’ व्यक्त करणारे तीव्र भाषेतील निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही जारी केले आहे. ही शस्त्रे पाकिस्तानला दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपयोगात येतील, हा अमेरिकेचा तर्क आपल्याला अमान्य असून, गेल्या अनेक वर्षांंचा या संदर्भातील इतिहास बोलका असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यामुळे अमेरिका काय भूमिका घेते, याकडे भारताचे लक्ष लागले आहे.