संघर्षग्रस्त येमेनमध्ये शिया बंडखोर व विरोधक यांच्यात धुमश्चक्री सुरू असतानाच तेथील हजारो लोकांना डेंग्यू रोगाची लागण झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सुमारे पाच हजार लोकांना डास चावल्याने डेंग्यू झाला आहे. मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी, वाढते तपमान यामुळे डास वाढले असून त्यामुळे डेंग्यूचा प्रसार होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मार्चपासून तीन हजार जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. तीन जणांचा त्यात मृत्यू झाला आहे.  येमेनमध्ये २०११ मध्ये डेंग्यूच्या साथीत पश्चिम होडयडा प्रांतात १५०० लोक मरण पावले होते. येमेनमध्ये सध्या शिया हुथी बंडखोर व माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सलेह यांचे समर्थक यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे.