तब्बल १६ वर्षांच्या प्रदीर्घ वियोगानंतर उल्हासनगर येथील महिला सरला जेठाराम बदलानी लारकाना येथील आपला भाऊ महेशकुमार याला भेटते खरी..परंतु आनंदातिशयाचा धक्का सहन न झालेल्या सरलाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येतो..एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच ही घटना लाहोर रेल्वे स्थानकात घडली.
महेशकुमार हे पाकिस्तानच्या लारकाना शहरात वास्तव्यास असून सरला बदलानी त्यांना भेटण्यासाठी १६ वर्षांनी आल्या होत्या. लाहोर रेल्वे स्थानकात दोघांची भेट झाल्यावर सरला यांनी आपल्या भावाला जवळ घेऊन अश्रू ढाळायला सुरुवात केली. हे आनंदाश्रूच होते, परंतु हा आनंदच सरला यांची जीवनयात्रा समाप्त करण्यास कारणीभूत ठरला. कारण हर्षभरित झालेल्या सरला यांना काही सेकंदांतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सरला या उल्हासनगरच्या रहिवासी होत्या. पाकिस्तानात येण्यासाठी आपल्या बहिणीने व्हिसासंदर्भात केलेला अर्ज याआधी चार वेळा फेटाळण्यात आला होता. आता तिचा अर्ज मंजूर झाला आणि तिने लाहोरला प्रयाण केले; परंतु तीच भेट अखेरची ठरली आहे.
या घटनेनंतर महेशकुमार यांनी व्हिसा पद्धतीच्या किचकटपणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आपल्या बहिणीच्या अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांना भारतातून येण्यासाठी तातडीने व्हिसा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.