अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना लासवेगास येथे भाषण देत असताना एका स्त्री निदर्शकाने बूट फेकून मारला, असे प्रसारमाध्यमांच्या बातम्यात म्हटले आहे. या महिलेला गुप्तचर सेवेने तातडीने ताब्यात घेतले आहे. क्लिंटन या २०१५ मध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवार असण्याची शक्यता असून स्क्रॅप रिसायकलिंग इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक संमेलनात बीज भाषण देत असताना त्यांच्या दिशेने बूट फेकण्यात आला, पण त्यांनी तो चुकवला. यापूर्वी अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना परदेशात बूट फेकून मारण्यात आला होता.
कुणीतरी माझ्या दिशेने काहीतरी फेकते आहे असे म्हणेपर्यंत त्यांनी अंदाजाने उजवा हात डोळ्यावर घेत मंचावरील प्रकाश चुकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही, असे लास वेगास रिव्ह्य़ू जर्नल या नियतकालिकाने म्हटले आहे. घनकचरा व्यवस्थापन इतका वादग्रस्त विषय ठरेल असे वाटले नव्हते. एक गोष्ट चांगली की, ज्यांनी बूट फेकला ते माझ्याप्रमाणे सॉफ्टबॉल खेळत नाहीत हे माझे नशीब.
काही अज्ञात महिलांनी एक हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या सभागृहात प्रवेश मिळवला होता व त्यांच्यातील एकीने क्लिंटन यांना बूट फेकून मारला, अशी माहिती गुप्त पोलिस सेवांनी दिली.