झिका या विषाणूजन्य रोगात नवजात बालकांमध्ये मायक्रोसेफली या मेंदूची कमी वाढ होत असलेल्या जन्मजात दोषाची निर्मिती कशी होते याचे कोडे उलगडण्यात यश आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मातेच्या गर्भात बाळाची वाढ होत असताना मेंदूची वाढ करणाऱ्या पेशी तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रथिनाच्या कामावर विपरीत परिणाम होत असतो. झिकाग्रस्त मातांना जी मुले होतात त्यांच्यात लहान बालकांचा मेंदू कमी आकाराचा असतो किंबहुना त्याची पूर्ण वाढ होत नाही. त्यांचे मेंदू त्यामुळे लहान असतात. झिका विषाणू हा विषाणूरोधक औषधांना दाद देत नाही व त्यामुळे चेतासंस्थेची जी हानी व्हायची ती होते असे संशोधकांचे मत आहे.

अमेरिकेतील येल विद्यापीठाचे वैज्ञानिक असे सांगतात, की झिका विषाणूमुळे स्कंद पेशी म्हणजेच मूलपेशी मारल्या जातात. त्यांच्यापासून मेंदूच्या निर्मितीच्या पेशी तयार होत असतात. मूलपेशीच मारल्या गेल्याने मेंदूच्या पेशींची वाढ होत नाही त्यामुळे त्याचा अपुरा विकास होतो. विश्लेषणानुसार झिकाचे विषाणू टीबीके १ नावाचे प्रथिन जे काम करते तेच काढून घेते.

प्रत्यक्षात हे प्रथिन पेशींचे ऊर्जाकेंद्र असलेल्या मायटोकाँड्रियात पेशीविभाजनाचे काम करत असते. तेथे हे प्रथिन झिकाग्रस्त बालकांमध्ये नसल्याने पेशी विभाजन होत नाही, त्यामुळे नवीन मेंदूपेशी तयार होण्याच्या ऐवजी त्या मरतात व त्यामुळे मायक्रोसेफली म्हणजे मेंदूची वाढ नवजात बालकात अपुरी होते. इतर विषाणू रोगांतही मायक्रोसेफली होतो; त्यातही मेंदूचा विकास कमी होण्यात हेच कारण असते. सध्याचे सोफोसबुविर हे औषध झिकाला रोखण्यात यशस्वी ठरत असून टीबीके १ हे पेशी विभाजनास लागणारे प्रथिनही त्यात सुरक्षित राहते असे सांगण्यात आले. या औषधाच्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरज असून नवीन औषधे तयार करण्याची गरज आहे, असे संशोधक मॅक्रो ओनोराटी यांनी सांगितले.

या संशोधनातून मायक्रोसेफलीच्या उपचारात व झिका विषाणू करीत असलेली हानी रोखण्यात यश येईल असे संशोधकांना वाटते. हे संशोधन ‘सेल रिपोर्टस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.