दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी जमलेल्या हजारो निदर्शकांनी शनिवारी अवघ्या राजधानीला वेठीस धरले. वारंवार पाण्याचे फवारे मारून तसेच लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करूनही नियंत्रणाबाहेर गेलेल्या हिंसक जमावाला काबूत आणणे मनमोहन सिंग सरकार आणि दिल्ली पोलिसांसाठी अवघड झाले होते.
चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सहा बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत शाळा आणि महाविद्यालयातील मुले-मुली आणि महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांचा हा जमाव राष्ट्रपती भवनात घुसण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा जवानांशी दिवसभर िहसक चकमकीत गुंतल्यामुळे ऐतिहासिक विजय चौकाला युद्धभूमीचे स्वरूप आले होते. या जमावाला थोपवताना पोलीस मेटाकुटीला आले होते.
शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून इंडिया गेट आणि राजपथावर शाळकरी व महाविद्यालयीन मुले व मुली तसेच महिला आणि नागरिक गटागटाने दाखल झाले. साडेनऊच्या सुमाराला हा जमाव हातात फलक घेऊन बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत आणि आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करीत राष्ट्रपती भवनाच्या दिशेने चाल करून गेला तेव्हा रायसीना हिल्सच्या पायथ्याशीच पोलिसांनी अडथळे उभारून त्यांना रोखले. हा शेवटचा अडथळा बळजबरीने पार करण्याचा निदर्शकांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना पाण्याचे फवारे सोडून व सौम्य लाठीमार करून पांगविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. गर्दी िहसक झाली तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. पण विजय चौक, राजपथ आणि इंडिया गेट परिसरात ठाण मांडणारा जमाव मागे हटला नाही. परिणामी पोलीस आणि निदर्शक यांच्यात दिवसभर छोटय़ा-मोठय़ा चकमकी सुरूच होत्या. अनेक तरुण मुला-मुलींनी पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. हाती लागेल ते पोलिसांच्या दिशेने भिरकावणाऱ्या जमावाला वेळोवेळी लाठीमार करीत पळवून लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. पण सूर्यास्त होताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
राजपथवरील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेचा फायदा घेऊन जमाव रात्री परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करेल, याची कल्पना आलेल्या पोलिसांनी विजय चौक रिकामा करून घेण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीमाराचा वापर केला.
जमावानेही पोलिसांवर जोरदार दगडफेक करून प्रतिकार केला. त्यामुळे विजय चौक परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. निदर्शक आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंनी अनेकजण जखमी झाले.
जखमींना राम मनोहर लोहिया इस्पितळात उपचारांसाठी पाठविण्यात येत होते. या सर्व परिसरात दगड, विटा, बाटल्या आणि अन्य वस्तूंचा सडा पडला होता.     

शिंदेंची पंतप्रधान, सोनियांशी चर्चा
दिवसभर चाललेल्या उग्र निदर्शनांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली. रविवारच्या सामूहिक बलात्कार प्रकरणी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली. परिस्थितीवर आपण स्वत: नजर ठेवून असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मनमोहन सिंग यांनी या वेळी शिंदे यांना दिल्लीची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. दिल्लीतील महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करताना रविवारच्या बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षाही मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेअंती सरकारच्या वतीने एक निवेदन करण्याची तयारी करण्यात येत होती. परिस्थिती बेकाबू झाल्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून चिंता व्यक्त केली आणि कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले.