पाकिस्तानच्या सैनिकांशी झुंजताना शहीद झालेले जवान हेमराज यांच्या आप्तांची सांत्वनभेट घेण्यासाठी राजकीय नेते सरसावत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या गावाचे रूप पालटण्यासाठी प्रशासनाला जाग आली आहे. गावात जाण्यासाठी रस्ते बांधले जात असून नागरी सुविधांबाबत वेगाने हालचाली सुरू आहेत.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून १६० किलोमीटरवर असलेल्या आणि मथुरेपासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेल्या शेरनगर या खेडय़ाची स्थिती गेल्या आठवडय़ापर्यंत दयनीय होती. गावाकडे जाणारा एकमेव रस्ता हा मातीचा आणि चिखलामुळे जवळपास निकामी झाला होता. हेमराजचा पाकिस्तानी सैनिकांनी शिरच्छेद केल्याने या गावात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळेच हेमराजच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले होते. त्यात लाजिरवाणी बाब अशी की गावातला ट्रान्स्फॉर्मर गेले कित्येक महिने नादुरुस्त असल्याने गावात कित्येक दिवस वीजपुरवठा नाही. त्यामुळे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार सुरू असताना लष्कराच्याच ट्रकच्या दिव्यांनी आणि खाजगी गाडय़ांच्या दिव्यांनी प्रकाश पाडावा लागला होता!
देशभर या जवानांच्या हत्येमुळे संतापाचा कडेलोट झाल्यानंतर राजकीय नेतेही लगबगीने हेमराजच्या गावाकडे जाऊ लागल्यावर प्रशासनाला गावातील नागरी सुविधांच्या बोजवाऱ्याची आठवण झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या हेमराज यांच्या गावी येणार असे समजताच गेल्या रविवारीच गावाकडे जाणारा रस्ता बांधला गेला, गावालगत हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड बांधले गेले. तातडीने नवा ट्रान्स्फॉर्मर बसविला गेला. हेमराजच्या वीरपत्नीचे काका द्रौपाल सिंग यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला.
यमुनेच्या तीरावर वसलेल्या या गावचा शेती हाच एकमेव आधार आहे. पूरन आणि जय सिंग हे हेमराजचे दोन भाऊही शेतकरीच आहेत. या गावात एकही शाळा नसल्याने मुलांना दुसऱ्या गावात रोज सायकलने जावे लागते. आपल्या गावात किमान सोयीही नाहीत आणि त्यामुळे चांगले जीवनमान लाभावे यासाठी लष्करात भरती झाले पाहिजे, असे गावातील अनेक तरुणांना वाटते.
गावात देशाबद्दल आणि लष्कराबद्दल प्रेम भरभरून आहे. बुधवारी हेमराजवर अंत्यसंस्कार झाले तेव्हा निर्मला (वय ७), प्रिन्स (५) आणि कल्लू (३) या त्याच्या मुलांसह वीरपत्नी धर्मावती आणि वीरमाता मीना यांच्याभोवती प्रसिद्धी माध्यमांचा गराडा पडला होता. धर्मावती यांनी सांगितले की, ‘देशासाठी माझ्या पतीने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे. प्रिन्स मोठा झाला की त्यानेही लष्करातच जावे आणि पित्याच्या हत्येचा बदला घ्यावा, असे मला ठामपणे वाटते.’