बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना, म्हणजे १९९९ सालाच्या बऱ्याच आधी पाकिस्तानी लष्कराने कारगिलसारख्या लष्करी कारवाईची योजना आखली होती, परंतु भुत्तो यांनी या कल्पनेला विरोध केला, असा रहस्यभेद भारताच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याने त्याच्या नव्या पुस्तकात केले आहे.
१९९२ ते १९९४ दरम्यान कराची येथे भारताचे महावाणिज्यदूत (कॉन्सल जनरल) असलेले राजीव डोगरा यांनी ‘व्हेअर बॉर्डर्स ब्लीड -अॅन इनसायडर्स अकाऊंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स’ या त्यांच्या पुस्तकात दोन देशांमधील अनेक वादग्रस्त मुद्दय़ांचा आढावा घेण्यात आला आहे.
भारत- पाकदरम्यानच्या ७० वर्षांच्या संघर्षांचा ऐतिहासिक, राजनैतिक आणि लष्करी दृष्टिकोनातून या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. फाळणीसाठी जबाबदार ठरलेल्या घटनांच्या क्रमवार नोंदींमुळे त्यानंतरच्या संघर्षांवर प्रकाश पडतो, तसेच विभाजनाची कहाणी आकारणाऱ्या लॉर्ड माऊंटबॅटन व मोहम्मद अली जिनांपासून ते अटलबिहारी वाजपेयी व मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या व्यक्तिरेखांचीही माहिती मिळते.
बेनझीर भुत्तो यांच्यावर कनिष्ठ स्तरावरील गुप्तचर विभागाच्या गॉसिपिंगचा थोडाफार परिणाम होत असे हे खरे असले, तरी वेळ पडल्यास त्या लष्कराविरुद्ध भूमिका घेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे. यामुळे त्यांच्या कार्यकाळात कारगिलची घुसखोरी किमान एकदा रोखली गेली असावी, असा पुस्तकात उल्लेख आहे.
त्या वेळचे लष्करी मोहिमांचे महासंचालक मेजर जनरल परवेझ मुशर्रफ यांची कल्पना बेनझीर यांनी कशी फेटाळून लावली होती, हे त्यांच्या एका मुलाखतीचा हवाला देऊन डोगरा यांनी नमूद केले आहे. पाकिस्तान युद्ध जिंकून श्रीनगर ताब्यात घेईल, असे गुलाबी चित्र मुशर्रफ यांनी उभे केले होते. परंतु बेनझीर यांनी त्यांना सांगितले : ‘जनरल, नाही. ते (भारत) म्हणतील की श्रीनगरमधून परत जा, इतकेच नव्हे तर आझाद काश्मीरमधूनही परत जा. कारण संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार, ज्या ठिकाणी सार्वमत घ्यायचे आहे तेथून, म्हणजे आझाद काश्मीरमधूनही आपल्याला माघारी यावे लागेल.’ बेनझीर यांचे हे ठाम विधान म्हणजे, एखाद्या पाकिस्तानी नेत्याने लष्करी उच्चाधिकाऱ्याला दु:साहस करण्याविरुद्ध खबरदार करण्याची दुर्मीळ घटना होती, असे मत डोगरा यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ऐतिहासिक दिल्ली- लाहोर बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी स्वागत केले, त्या वेळी पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या उंचावरील भागात शिरकाव केल्याची त्यांना कल्पना होती, असेही या पुस्तकात म्हंटले आहे. यामुळेच बसजवळ गेल्यानंतर शरीफ हे वाजपेयींना आलिंगन देण्यासाठी वाकले, तेव्हा ते बेचैन दिसत होते, याचाही लेखकाने उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, तर १९९३ सालच्या मुंबईतील बाँबस्फोट मालिकेचीही शरीफ यांना पूर्वकल्पना होती व त्यांनी त्यासाठी मंजुरी दिली होती, असाही लेखकाचा दावा आहे.
भारतीय विदेश सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले राजीव डोगरा यांनी इटाली, रोमानिया, माल्डोव्हा, अल्बानिया आणि सॅन मरिनो या देशांमध्ये राजदूत म्हणून, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम येथील संस्थांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. त्यांचे पुस्तक रूपा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.