१९६० चे दशक हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचे दशक मानले जाते. याच काळात आंतरराष्ट्रीय अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडून यायला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेली नवी पिढी तेव्हा उदयाला येत होती. या पिढीने आपल्या आधीच्या पिढीची मूल्ये, संस्कृती, राजकारण या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती. नव्या मूल्यव्यवस्थेवर आधारीत असे एक नवे जग घडवण्याचा आशावाद या तरुणाईत होता. त्यामुळे या तरुणाईने जिथे संधी मिळेल तिथे आणि ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे जुन्या व्यवस्थेविरुद्ध आपला आवाज उठवायला सुरुवात केली.

अतिशय खळबळजनक अशा या काळातले १९६८ हे वर्ष सर्वाधिक अस्वस्थतेचे होते. या वर्षी अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाच्या विरोधी आंदोलने चालू होती. कृष्णवर्णीय समूहांना समान नागरी अधिकार मिळायला हवेत यासाठी सुरू असलेली चळवळ ऐन भरात होती. १९६८ मध्येच कम्युनिस्ट जगात झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट राज्यकर्त्यांविरुद्ध उठाव झाला. चीन सांस्कृतिक क्रांतीच्या वेदना भोगत होता. मात्र, १९६८ मध्ये जितकी अस्वस्थता फ्रान्समध्ये होती तितकी अस्वस्थता इतर कोणत्याच देशात नव्हती. अतिशय कर्तबगार अशा फ्रेंच राष्ट्राध्यक्ष दी गॉल यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांचे आणि कामगारांचे देशभर उठाव झाले होते. उठावांची तीव्रता इतकी होती, की त्याची परिणती अध्यक्ष गॉल यांच्या राजीनाम्यात झाली. एका विलक्षण अस्वस्थ काळातून फ्रेंच समाज जात होता. त्याचेच प्रतिबिंब या उठावात उमटले होते.

त्यानंतर ४८ वर्षांनी आज पुन्हा फ्रेंच समाज अस्थिरतेच्या अस्वस्थ काळातून जात आहे. फ्रेंच अर्थव्यवस्थेची चक्रे मंदावलेली आहेत. फ्रेंच राजकीय नेतृत्व अतिशय नेभळट आहे. त्यामुळे युरोपीय राजकारणात फ्रान्स बाजूला पडत चालला असून बलवान जर्मनी आपले वर्चस्व प्रस्थापित करीत आहे. देशावर सातत्याने भयानक असे दहशतवादी हल्ले होत आहेत. एक प्रकारचे सार्वत्रिक भीतीचे वातावरण फ्रेंच समाज सध्या अनुभवतो आहे. अशा या अस्वस्थ कालखंडात लोकांना भडक राजकारण करणारे उथळ नेतृत्व आकर्षति करते. असे नेतृत्व देणाऱ्या आणि वैचारिकदृष्टय़ा अति उजवीकडे झुकलेल्या मरी ल पेन या बाई आणि त्यांचा नॅशनल फ्रंट हा पक्ष आज फ्रान्समध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत चालला आहे. गंमत म्हणजे मरी ल पेन यांचा जन्म १९६८ चा आहे. म्हणजे एका विलक्षण अस्वस्थ कालखंडात जन्माला आलेल्या या बाई आता १९६८ इतक्याच, किंवा त्याहूनही अधिक अशा अस्थिर काळातील फ्रेंच समाजाला नेतृत्व देऊ पाहत आहेत. एका अर्थाने पाहू जाता अस्वस्थतेचे अपत्य आता त्याच अस्वस्थतेला आपल्या अंगावर घेत आहे.

या लेखाचा विषय मरी ल पेन असला तरी त्यांचा उदय एका विशिष्ट परिस्थितीत झालेला आहे. ती पाश्र्वभूमी समजावून घेतल्याशिवाय ल पेन यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे गमक आपल्याला सापडणार नाही. तसेच ल पेन ज्या पक्षाचे आणि विचारधारेचे नेतृत्व करतात त्याला फ्रेंच राजकारणात एक परंपरा आहे. त्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

ल पेन यांचा नॅशनल फ्रंट हा राजकीय पक्ष गेली ४५ वष्रे फ्रान्समध्ये राजकारण करीत आहे. मरी ल पेन यांच्याआधी त्यांचे वडील जॉन यांच्या हाती पक्षाची सूत्रे होती. जॉन हे नॅशनल फ्रंटचे संस्थापक सदस्य. त्यांनी १९७२ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. ते २०११ पर्यंत म्हणजे ४० वष्रे पक्षात सर्वेसर्वा होते. २०११ ला त्यांनी मरी ल पेन यांच्या हाती पक्षाची सूत्रे दिली. १९७२ पासून कायमच नॅशनल फ्रंटच्या राजकीय भूमिका अतिउजवीकडे झुकलेल्या होत्या. त्यामुळे या पक्षाला फ्रान्समध्ये कधीही फारशी लोकप्रियता लाभू शकली नव्हती. निवडणुकांत पराभूत होणारा पक्ष अशीच नॅशनल फ्रंटची इमेज होती. पक्षाच्या संस्थापक जॉन यांच्या काही भूमिका फारच अतिरेकी होत्या. फ्रान्समध्ये उत्तर आफ्रिकेतून मोठय़ा संख्येने कामगार येत असतात. त्यांच्या स्थलांतराला नॅशनल फ्रंटचा कायम विरोध होता. मरी यांचे वडील त्यांच्या ज्यूविरोधी भूमिकेसाठीही ओळखले जातात. जॉनसाहेबांचा हा ज्यूविरोध आणि अतिरेकी भूमिका मरी यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली तेव्हा पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने अडचणीची ठरू लागली. परिणामत: मरी यांनी २०१५ मध्ये आपल्याच वडिलांना- पक्षाच्या संस्थापकांना पक्षातून निलंबित केले.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे, की मरी ल पेन यांची राजकीय भूमिका सौम्य आहे. त्यासुद्धा अति उजवीकडे झुकलेल्या भूमिकाच घेत असतात. ल पेन यांच्या वैचारिक भूमिकेचे चार मुख्य घटक मानता येतील. वडिलांप्रमाणेच त्या आफ्रिका आणि पश्चिम आशियातून येणाऱ्या स्थलांतरितांना विरोध करत असतात. मात्र, जॉन यांच्या काळात कधीही स्थलांतरित लोक लक्षावधीच्या संख्येने युरोपात आले नव्हते. सीरियातील यादवी युद्धामुळे २०१५ मध्ये लाखो निर्वासित युरोपात यायला सुरुवात झाली. या निर्वासितांना फ्रान्सने आश्रय देण्यास मरी यांचा विरोध आहे. स्थलांतरितांना विरोध याबरोबरच इस्लामविरोध हीसुद्धा मरी यांची भूमिका आहे. स्थलांतरित लोकांमुळे व इस्लामच्या वाढत्या प्रभावामुळे फ्रेंच मूल्यव्यवस्था आणि समाजजीवन धोक्यात आले आहे असे मरी यांना वाटते. (यालाच जोडून फ्रेंच समाजाच्या काही मूलभूत धारणासुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. फ्रेंच समाजात सेक्युलॅरिझमची परंपरा अतिशय प्रबळ आहे. सार्वजनिक जीवनात धर्माला काहीही स्थान नाही असे फ्रेंच समाजाला वाटते. अशा या सेक्युलर परंपरेवर इस्लामचे आक्रमण होत आहे असे फ्रेंचांना वाटते.)

मरी यांची ही मते ऐकून अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची आठवण येऊ शकते. मात्र, मरी यांना स्वत:ला ट्रम्प यांच्याबरोबर तुलना केलेली आवडत नाही. ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकेत मुस्लिमांना येण्यावर बंदी असावी. मरी यांनी इतके आक्रस्ताळे विधान अजून केलेले नाही. मात्र, अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांत हिलरी क्लिंटन सोडून कोणीही निवडून आले तरी चालेल, असे मरी यांचे मत आहे. त्यांना असे वाटते की, जर हिलरी निवडून आल्या तर ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अजिबात चांगले चिन्ह असणार नाही. मरी आणि ट्रम्प यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. मरी या २०१७ च्या फ्रान्समधील अध्यक्षीय निवडणुका जिंकण्याची अतिशय गांभीर्याने तयारी करीत आहेत. त्यांची पावले त्या दिशेने पडत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या आक्रस्ताळेपणामुळे रिपब्लिकन पक्षाची निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी कमी होत गेली आहे.

मरी यांच्या वैचारिक भूमिकेचे आणखी दोन महत्त्वाचे घटक आहेत. फ्रेंच राष्ट्रीयत्व आणि सार्वभौमत्व याला त्या प्राथमिकता देतात. त्यामुळे या सार्वभौमत्वावर आणि राष्ट्रीयत्वावर आघात करणाऱ्या युरोपीय गटाला मरी यांचा विरोध आहे. फ्रान्स हा युरोपीय गटाच्या स्थापनेपासून असलेला सदस्य आहे. फ्रान्सने युरोपीय गटातून बाहेर पडावे आणि आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व परत मिळवावे अशी भूमिका त्या घेत असतात. युरोपीय गटाने आणलेल्या ‘युरो’ या सामायिक चलनालासुद्धा त्यांचा विरोध आहे. त्यांना असे वाटते की, फ्रान्सने युरो या चलनाचा त्याग करावा आणि फ्रँक हे जुने चलन पुन्हा स्वीकारावे. युरोपीय गटाचा एकच ‘शेंघेन’ व्हिसा आहे. त्यामुळे युरोपात मुक्त संचार करता येतो. त्यालाही त्यांचा विरोध आहे.

गेल्या २५ वर्षांत युरोपीय गट अधिक उदारमतवादी आणि खुला होत गेला आहे. संकुचित राष्ट्रीय सीमा ओलांडून एक आदर्शवादी वाटावी अशी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न युरोपात सुरू आहे. सामायिक चलन, मुक्त संचार, युरोपियन पार्लमेंट, सामायिक परराष्ट्र आणि संरक्षण धोरण असे काही त्याचे महत्त्वाचे घटक आहेत. अशी व्यवस्था उभी करायची म्हणजे राष्ट्रीयत्व आणि देशाचे सार्वभौमत्व यावर बंधने घालून घ्यावी लागतात. मनाला वाटेल तसे वागता येत नाही. युरोपीय गटाचे म्हणून काही नियम असतात, ते पाळावे लागतात. परिणामी अधिकाधिक उदार आणि मुक्त अशी एक युरोपीय व्यवस्था गेल्या २५ वर्षांत उभी करण्यात आली. तिचे कार्यक्षेत्र वाढवत नेले गेले. याला मरी यांचा पूर्णत: विरोध आहे.

मरी ल पेन यांची ही वैचारिक भूमिका लक्षात घेता आपण आता त्यांच्या राजकीय कारकीर्दीकडे नजर टाकू या. मरी यांच्या प्रत्यक्ष राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९९८ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी झाली. त्यापूर्वी त्या वकिली करीत होत्या. तशा आधीपासूनच त्या नॅशनल फ्रंटमध्ये सक्रिय होत्या. वयाच्या १३ व्या वर्षांपासून वडिलांसोबत त्या प्रचारात सहभागी होत होत्या. २००४ मध्ये त्या फ्रान्समधून युरोपियन पार्लमेंटवर निवडून गेल्या. तेव्हापासून त्या युरोपियन पार्लमेंटच्या सदस्य आहेत. चार वर्षांपूर्वी- म्हणजे २०१२ साली त्या नॅशनल फ्रंटतर्फे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. अर्थातच त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, पक्षाच्या दृष्टीने आशावादी बाब ही होती, की २००२ मध्ये जेव्हा मरी यांचे वडील जॉन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांना जितकी मते मिळाली, त्याहून अधिक मते मरी यांना मिळाली होती.

२०१२ पासून मरी यांची आणि नॅशनल फ्रंटची लोकप्रियता क्रमाने वाढतच गेली आहे. २०१४ मध्ये जेव्हा युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यात फ्रान्समधून सर्वाधिक मते नॅशनल फ्रंटला मिळाली. नॅशनल फ्रंटच्या वैचारिक भूमिकेत युरोपियन युनियनला विरोध करणे हे महत्त्वाचे सूत्र आहे. आणि त्याच नॅशनल फ्रंटचे सर्वाधिक उमेदवार युरोपियन पार्लमेंटवर निवडून जाणे हे काही चांगले लक्षण नाही. परंतु २०१४ च्या निवडणुकांत केवळ फ्रान्समधूनच उजव्या गटाचे उमेदवार निवडले गेले असे नाही. इतर युरोपीय देशांतूनसुद्धा असे उमेदवार युरोपियन पार्लमेंटवर निवडून आले. विविध देशांतून उजवे राजकीय पक्ष युरोपियन पार्लमेंटमध्ये केवळ निवडूनच गेले नाहीत, तर मरी ल पेन यांच्या पुढाकाराने अशा विविध देशांतील आक्रस्ताळ्या उजव्या, युरोपविरोधी राजकीय पक्षांचा एक गट युरोपीय पार्लमेंटमध्ये तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे युरोपीय गटाचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या पार्लमेंटमध्येच युरोपीय गटाला विरोध करणारा गट तयार होईल!

२०१५ मध्ये फ्रान्समध्ये प्रांतिक निवडणुका होत्या. या निवडणुका दोन फेऱ्यांत घेतल्या जातात. त्यापकी पहिल्या फेरीत नॅशनल फ्रंटने इतर दोन्ही पक्षांना मागे टाकले होते. त्यांना सर्वाधिक- म्हणजे सत्तर लाख मते मिळाली होती. मात्र, फ्रेंच समाजजीवन आणि अर्थकारण याच्या मुख्य प्रवाहाला असलेला नॅशनल फ्रंटच्या राजकीय आणि आर्थिक विचारधारेचा धोका ओळखून दुसऱ्या फेरीत सोशालिस्ट आणि रिपब्लिकन पक्षाने हातमिळवणी केली. त्यामुळे तेरापकी एकाही प्रांतात नॅशनल फ्रंट सत्तेत येऊ शकला नाही. मध्यममार्गी आणि उदारमतवादी फ्रेंच समाजाला अभिमान वाटावा अशी ही घटना होती. तथापि निवडणुकीनंतर या दोन्ही मुख्य राजकीय पक्षांनी विजयाचा आनंद साजरा न करता नॅशनल फ्रंटचा धोका किती जास्त आहे, हा मुद्दा अधोरेखित केला. या दोन राजकीय पक्षांनी हातमिळवणी करणे, हे नॅशनल फ्रंट आणि मरी ल पेन यांचा धोका वाढत चालल्याचे लक्षण मानता येईल. आजघडीला मरी ल पेन यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल फ्रंटकडे फ्रान्समधील १२ शहरांचा कारभार असून, एकूण मिळून त्यांचे १५०० च्या आसपास प्रतिनिधी विविध प्रतिनिधीगृहांत आहेत.

आता मरी ल पेन २०१७ च्या एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत नॅशनल फ्रंटच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार हे जवळपास नक्की आहे. त्यांची क्रमाने वाढत गेलेली लोकप्रियता पाहू जाता त्यांच्याकडे अजिबातच दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या निवडणुका जिंकतील किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. जिंकल्या नाहीत तरी त्या दुसऱ्या फेरीत नक्की जाणार. राजकीयदृष्टय़ा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या नॅशनल फ्रंटचा उमेदवार इतक्या पुढे येऊ शकला, ही अंतर्मुख होऊन विचार करावा अशीच बाब आहे. फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणुकीत पुढील वर्षी काय होते याचे युरोपीय राजकारणावर फार गंभीर परिणाम होतील. त्यामुळे एका अर्थाने युरोपीय गटाच्या यशाची किंवा अपयशाची चाचणीच पुढील वर्षी फ्रान्समध्ये होईल. त्या अर्थाने मरी ल पेन या युरोपच्या भविष्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या राजकीय नेत्या आहेत. त्या काय करतात आणि कितपत प्रभाव पाडतात, यावर साऱ्या जगाची नजर असेल.

मरी यांचा हा राजकीय उदय हे फ्रेंच आणि युरोपीय समाज कोणत्या दिशेने जात आहेत याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नक्कीच पाहता येईल. राजकारणात कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याला तो कोणत्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतो, यासंदर्भात पाहावे लागते. मरी ल पेन मर्यादित स्तरावर पाहता फ्रान्समधील आणि व्यापक अर्थाने पाहता युरोपातील अस्वस्थ आणि असुरक्षित काळातील जनमानसाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर युरोपातील पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, हॉलंड अशा इतर देशांतसुद्धा उजव्या राजकीय पक्षांचा जोर वाढत आहे. तसेच काही ठिकाणी (उदा. ग्रीसमध्ये) अतिडावीकडे झुकलेले पक्ष जोरात आहेत. मात्र, या दोन्ही प्रकारच्या गटांचे वैशिष्टय़ हे, की ते युरोपियन युनियनला व त्यासोबत येणाऱ्या मुक्त अर्थकारणाला टोकाचा विरोध करतात. युरोपीय गटात राहून फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त होते असे हे गट मानतात. आपण आपले राष्ट्रीयत्व आणि सार्वभौमत्व परत मिळवायला हवे असे त्यांना वाटते.

या अशा अतिरेकी उजव्या आणि डाव्या पक्षांचा समर्थन करणारा त्या- त्या देशातील वर्ग, विशेषत: मध्यमवर्ग- असा आहे की ज्याला आपल्या भविष्याची चिंता वाटते. त्याला असे वाटते की, आफ्रिका आणि आशियातील स्थलांतरित नागरिक त्यांच्या नोकऱ्यांवर टाच आणत आहेत. ते आपला इस्लाम धर्म आणि संस्कृती न सोडता त्या- त्या युरोपीय देशांची आयडेंटिटी धोक्यात आणू पाहत आहेत. त्यामुळे अशा स्थलांतरित लोकसंख्येचे काय करायचे, हा मोठाच प्रश्न या युरोपीय समाजांसमोर आहे. जोपर्यंत युरोपीय गटात राहून आíथक फायदे मिळत होते, स्वस्त कामगार उपलब्ध होत होते, लाखो निर्वासित युरोपात येत नव्हते, तोपर्यंत युरोपीय गटाचा प्रभाव आणि आशावाद वाढत गेला. मात्र, हे चित्र गेल्या सात-आठ वर्षांत हळूहळू बदलू लागले आहे.

युरोपच्या आर्थिक संकटांची सरुवात झाली २००८ मध्ये. त्या वर्षी आंतरराष्ट्रीय अर्थकारण मंदीच्या गत्रेत लोटले गेले. तेव्हापासून युरोपचे चित्र पालटू लागले. २०१०-११ मध्ये युरोपातील काही देश आíथक संकटात सापडले. त्यांना मदत करावी की करू नये, यावर युरोपीय गटात फूट पडण्याची चिन्हे होती. ते संकट २०१२-१३ मध्ये हळूहळू टळतेय असे वाटत होते तोच २०१४ मध्ये रशिया आक्रमक झाला. त्यापुढील वर्षी २०१५ मध्ये तर लक्षावधी निर्वासित सीरियातून युरोपात आले. अशी एकापाठोपाठ एक संकटांची मालिकाच युरोपवर कोसळत गेली आहे. या सगळ्याचा सामना करताना युरोपीय गटाची दमछाक होत आहे.

अशा या आíथक व राजकीय संकटांना जोडूनच संरक्षणाच्या क्षेत्रात दहशतवादाचा धोका अधिकाधिक गंभीर होत गेला. दहशतवादी हल्ल्यांसाठी फ्रान्स तर विशेष ‘लक्ष्य’ ठरले आहे. २०१५ मध्ये दोन आणि २०१६ मध्ये दोन असे चार अतिशय भीषण हल्ले फ्रान्सवर झाले. चारही हल्ल्यांनी फ्रेंच समाजाच्या मनोधर्यावर फारच नकारात्मक परिणाम केला आहे. फ्रेंच राष्ट्रीय जीवनाची प्रतीके मानली जावीत अशी ठिकाणे या हल्ल्यांसाठी निवडली गेली होती. ‘चार्ली हेब्डो’ नावाचे व्यंगचित्रे काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले मासिक हे फ्रेंच समाजाच्या खुलेपणाचे, आचारस्वातंत्र्याचे प्रतीक होते. त्याच्या ऑफिसवर भयानक हल्ला झाला. पुढे राजधानी पॅरिसमधील उपाहारगृहे आणि सांगीतिक मफली लक्ष्य करण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात झाली असे मानले जाते त्या १४ जुलला या वर्षी नीस शहरात दहशतवादी हल्ला केला गेला. त्यानंतर बाराच दिवसांनी एका कॅथलिक धर्मगुरूची हत्या केली गेली. कॅथलिक ख्रिश्चन धर्म, राज्यक्रांतीचा दिवस यांचे फ्रेंच समाजाच्या दृष्टीने फारच महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या समाजाची अशी सांस्कृतिक प्रतीके जाणीवपूर्वक लक्ष्य केली जातात, तेव्हा तो समाज अतिरेकी भूमिका घेणाऱ्या आक्रमक नेत्याच्या मागे जाणे हे अगदीच स्वाभाविक मानता येईल. त्यामुळे या सर्व दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर इस्लामविरोधी आणि स्थलांतरितविरोधी भूमिका घेणाऱ्या मरी ल पेन यांची लोकप्रियता वाढतच गेली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या बरोबरीनेच मरी ल पेन यांच्या उदयासाठी फ्रेंच राजकीय नेतृत्वसुद्धा तितकेच जबाबदार आहे. गेल्या वीस वर्षांत फ्रेंच राजकारणात सोशालिस्ट आणि रिपब्लिकन अशा दोन्ही मुख्य पक्षांकडून असे नेतृत्व पुढेच आले नाही, की ज्याचा देशात आणि देशाबाहेर प्रभाव पडेल. त्यामुळे एका बाजूला फ्रान्सचे राजकीय महत्त्व कमी होत गेले, तर दुसऱ्या बाजूला आíथक संकटे समोर येत राहिली. परिणामी फ्रेंच जनतेचा राजकीय नेतृत्वाविषयी दिवसेंदिवस भ्रमनिरास होत गेला. ज्या नॅशनल फ्रंटची दखल घ्यायची नाही असे राजकीय नेते आणि मीडिया मानत होता, त्याच नॅशनल फ्रंटकडे आणि त्यांच्या मरी ल पेनसारख्या नेत्यांकडे जनता आकर्षति होत गेली. आतापर्यंत नॅशनल फ्रंटला कधीच सत्ता चाखायला मिळाली नाही, हीच गोष्ट त्यांचे इतर दोन राजकीय पक्षांपासूनचे वेगळेपण अधोरेखित करायला उपयोगी पडली आहे. सोशालिस्ट आणि रिपब्लिकन पक्ष काय करू शकतात, याची आता फ्रेंच जनतेला पुरेशी कल्पना आलेली आहे. त्यामुळे नॅशनल फ्रंटसारख्या नव्या पक्षाला आणि मरी ल पेनसारख्या प्रस्थापित नसलेल्या नेतृत्वाला संधी द्यावी, असाही विचार फ्रेंच जनतेमध्ये मूळ धरू पाहत आहे.

इतिहासाचा हा दाखला आहे की, आíथक मंदी आणि सांस्कृतिक असुरक्षितता जेव्हा समाजाला ग्रासून टाकते तेव्हा ते समाज लोकानुनयी राजकारण करणाऱ्या, उजवीकडे झुकलेल्या नेतृत्वाकडे आकर्षति होतात. १९३० च्या दशकात युरोपात इटली, जर्मनी, स्पेनमध्ये फासिस्ट गटांचा उदय अशाच परिस्थितीत झाला होता. (भारतातही मोदींच्या निवडून येण्याला आर्थिक अडचणी आणि प्रस्थापित नेत्यांचा राजकीय नेभळटपणा कारणीभूत झाला होता.) दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांत अति उजवीकडे झुकलेले गट कायमच अस्तित्वात होते. मात्र, त्यांना राजकीय अवकाशात अजिबात संधी मिळत नव्हती. लोकशाही आणि उदारमतवाद यांचा प्रभाव जितका वाढत गेला होता, तितके असे गट संदर्भहीन होत गेले.

मात्र, २००८ नंतरच्या गेल्या पाच-सात वर्षांत हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. ज्या मुद्दय़ांवर हे अति उजवे राजकीय पक्ष लढत होते, ते- स्थलांतर होऊ द्यायचे की नाही, युरोपीय गटात राहून आर्थिक प्रगती होते का, आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व परत मिळवायला हवे की नको- हे मुद्दे आता युरोपीय राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे या उजव्या पक्षांचे महत्त्वसुद्धा हळूहळू वाढत गेले आहे. एकूण युरोपात चिन्हे अशीच आहेत, की आणखी काही काळ तरी हे पक्ष असेच वाढत राहतील. मरी ल पेन हे अशा वाढत्या प्रभावाचे आणि एकूण परिस्थितीतील अस्वस्थतेचे सर्वात प्रभावी प्रतीक आहे. त्यांचा विजय होणे हे युरोपातील उदारमतवादी लोकशाहीच्या दृष्टीने अजिबात चांगले लक्षण नाही. मात्र, त्यांचा उधळत चाललेला राजकीय वारू रोखायचा कसा, याचे कोणतेही उत्तर फ्रेंच राजकारणात आणि पर्यायाने युरोपीय राजकारणात कोणाकडेही दिसत नाही. त्यामुळे मरी ल पेन यांच्यासारख्या उजव्या नेतृत्वाचा उदय ही खरी शोकांतिका नाही; तर युरोपातील सध्याच्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला आजच्या समस्यांवर उत्तरे शोधता येत नाहीत, ही जास्त दु:खाची गोष्ट आहे!
संकल्प गुर्जर