कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर पदाची संधी मिळालेल्या अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांची मुदत संपत आली आहे. या दोघी दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदांचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येते. १५ नोव्हेंबपर्यंत नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याने इच्छुकांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सभागृहात बहुमत असल्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सतेज पाटील व हसन मुश्रीफ या आमदार द्वयीकडे त्यांचा राबता वाढू लागला आहे.

महापालिका निवडणुकीत  कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांने यश मिळवत सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या तडजोडीप्रमाणे वरील प्रमाणे निवडी करण्यात आल्या. त्यांना दिलेली एक वर्षांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यांना मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदरच राजीनामे द्यावे लागणार असून, १५ नोव्हेंबपर्यंत नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महासभा बोलावून त्यामध्ये त्या दोघी राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सभागृहात बहुमत असल्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेच पदाधिकारी होण्याची शक्यता असली तरी ऐनवेळी बाजी मारण्याच्यादृष्टीने भाजप-ताराराणी आघाडी यांचे प्रयत्न आहेत. शिवाय या निवडीच्या निमित्ताने घोडेबाजार भरण्याच्या चच्रेला ऊत आला आहे.

सतेज पाटील व हसन मुश्रीफ हे नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांत व्यस्त आहेत, उमेदवारी अर्ज या महिन्याच्या अखेपर्यंत भरले गेल्यानंतर ते याकडे लक्ष देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्ता सूत्रानुसार आगामी महापौरपद हे राष्ट्रवादी पक्षाकडे, तर उपमहापौरपद कॉँग्रेसकडे जाणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी महापौर बाबू फरास यांच्या पत्नी हसीना फरास,माधवी गवंडी,अनुराधा खेडेकर यांची नावे चच्रेत आहेत. कॉँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी संजय मोहिते  तर  स्थायी समिती सभापतिपद नगरसेवक राहुल माने यांना दिले जाईल, अशी शक्यता आहे