निरनिराळ्या घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या कोल्हापूर महापालिकेतील ‘ट्री गार्ड’ घोटाळ्याचे प्रकरण बुधवारी विरोधी ताराराणी – भाजपच्या नगरसेवकांनी उघडकीस आणले. मोठय़ा बांधकामाच्या ठिकाणाहून ट्री गार्डसाठी हजारो रुपये घेतले, पण त्याचा हिशोब न ठेवता ही रक्कम खिशात घालणाऱ्या टोळीचे कारनामे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाची समूळ चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली आहे. घटनास्थळी आलेले नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संबंधित कागदपत्रे सील केली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

महापालिका प्रशासनानेही मोठय़ा बांधकामाच्या ठिकाणी किमान २० ट्री गार्ड बसवून वृक्ष संगोपन करण्याचे बंधन घातले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने गरफायदा उठवत खिसे भरण्याचा उद्योग आरंभला आहे. आज सत्यजित कदम यांनी या कामाची माहिती घेतली असता या व्यवहारातील गौडबंगाल उघडकीस आले.

सुनील कदम, सत्यजित कदम, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे आदींनी याची कागदपत्रे तपासून पाहिली असता त्यामध्ये चुकीच्या नोंदी केल्याचे दिसले. त्यांनी उद्यान विभागाच्या कारकून राजेघाडगे यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी दिलेल्या उत्तरात मोठय़ा विसंगती आढळून आल्या. कोणत्या प्रभागात, कोणत्या नगरसेवकांना किती ट्री गार्ड दिले याची माहिती सांगताना राजेघाडगे गडबडून गेल्या. त्यांनी ज्या व्यक्तीकडे ट्री गार्ड दिल्याचे सांगितले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण साहित्य घेतले नसल्याचे स्पष्ट करून आपणाला केवळ बुजगावणे म्हणून उभे केल्याचे सांगितले.

आजवर केवळ ५० कामाच्या ठिकाणाहून ट्री गार्ड दिल्याच्या नोंदी पाहून नगरसेवकांचा संशय बळावला. त्यांनी नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना पाचारण केले. त्यांनी संबंधित कागदपत्रे सील केली असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवकांनी २०१२ सालापासून किती बांधकामे झाली, अंतर्गत किती ट्री गार्ड उपलब्ध झाले, त्याचे वाटप कोठे, कोणाला केले याची सविस्तर माहिती मिळावी अशी मागणी केली.