रिओ दी जानिरो येथे फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी माझे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी १.२० कोटी जनतेतून तुम्हाला फिफा विश्वचषकात प्रतिनिधित्व करणारे ११ खेळाडू निर्माण करता आले नाहीत, हे ब्लॅटर यांचे वाक्य मला खटकले. त्यामुळेच मी इंडियन सुपर लीगच्या निमित्ताने फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे. आता फिफा विश्वचषकात भारताचा संघ मला पाहायचाय, अशा शब्दांत चेन्नईन एफसी संघाचा सहमालक आणि अभिनेता अभिषेक बच्चनने भावना व्यक्त केल्या.
मुंबईत  गुरुवारी चेन्नईन एफसीच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. त्या वेळी अभिषेक म्हणाला, ‘‘प्रो-कबड्डी लीगमधील जयपूर पिंक पँथर्सच्या यशानंतर आता माझ्या चेन्नई संघाकडूनही तशाच कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. क्रिकेटशिवाय आता अन्य खेळांकडेही लोकांचा कल वाढू लागलाय. त्यामुळे इंडियन सुपर लीगला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.’’
चेन्नई संघाच्या तयारीविषयी अभिषेक म्हणाला, ‘‘गेल्या काही दिवसांपासून संघातील खेळाडूंचा खडतर सराव सुरू आहे. स्पर्धेसाठी रणनीती आखण्याचे काम सुरू असून खेळाडूंना पाठिंबा देणे, हे माझे काम आहे. लवकरच तळागाळातील फुटबॉलपटूंसाठी आमचे फुटबॉल शिबीर सुरू होईल.’’
हृतिक रोशनही फुटबॉलच्या मैदानात
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने इंडियन सुपर लीगमधील पुणे सिटी एफसीचे सहमालकपदाचे हक्क मिळवत फुटबॉलच्या मैदानात उडी घेतली आहे. अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, रणबीर कपूर आणि वरुण धवन सहमालकांच्या मांदियाळीत स्थान मिळवणारा हृतिक हा आणखीन एक बॉलीवूड अभिनेता ठरला आहे.
‘‘राजेश वाधवान समूहाच्या मालकीच्या असलेल्या पुणे सिटीसोबत इंडियन सुपर लीगशी जोडला गेल्याचा आनंद होत आहे. भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी आयएसएलच्या निमित्ताने क्रांतीकारी वाटचाल सुरू झाली आहे. पुणे संघासोबतच्या माझ्या सहकार्यामुळे संघ मजबूत करण्यासाठी तसेच युवा खेळाडूंचे कौशल्य सुधारण्यास मदत होईल, अशी आशा आहे,’’ असे रोशन यांनी
सांगितले.
आयएसएलमध्ये माझी भागीदारी नाही -सलमान खान
पुणे संघाचे सहमालकत्व असल्याचा बॉलीवूड अभिनेता सलमान खानने साफ शब्दांत इन्कार केला आहे. ‘‘आयएसएलमधील कोणत्याही संघात माझी भागीदारी नाही. पुणे संघाचा भाग होण्यासाठी मला धीरज आणि कपिल वाधवान यांनी सांगितले होते. पण अन्य कंपन्यांशी माझे करार असल्यामुळे मी पुणे संघाशी जोडलो गेलो नाही. पण आयएसएलच्या यशासाठी मी शुभेच्छा देतो. भारतीय फुटबॉलला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आयएसएल ही स्पर्धा महत्त्वाची आहे,’’ असे सलमानने सांगितले.