“कोणताही खेळाडू हा पैशाचा भुकेला नसतो. आपल्या देशासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त पदकं मिळवणं हे त्याचं ध्येय असतं. चांगली कामगिरी केल्यानंतर कोणीतरी येऊन पाठ थोपटली, तरीही आम्हाला पुरेसं होतं. पण आश्वासन देऊन एखाद्या खेळाडूला आस लावायची, आणि नंतर वर्षानुवर्षे त्याला ताटकळत ठेवायचं हा प्रकार निराशाजनक आहे.” मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मिकी काहीसा निराश वाटत होता. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युवराजला हॉकीतली कामगिरी पाहून मुंबईत घराचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात सत्ताबद्दल झाला, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं. या ६ वर्षांत युवराजची घरासाठी वणवण अजून सुरुच आहे.

युवराज आणि त्याचा भाऊ देवेंद्र हे मुंबईतल्या मरिन लाईन्स परिसरात एका छोट्याशा घरात राहतात. काही वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरात राहूनही युवराजच्या घरात वीज नव्हती, शौचालयाची सुविधा नव्हती. हॉकी विश्वचषकात त्याने केलेली कामगिरी पाहून स्थानिक शिवसेना नेते आणि माजी खेळाडू धनराज पिल्ले यांच्या पुढाकाराने युवराजच्या घरात वीज आली. युवराजची ही परिस्थिती सरकारदरबारी पोहोचल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला घर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. आज राज्यात देवेंद्र फडवणवीस सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही युवराजला त्याच्या हक्काचं घर मिळालेलं नाहीये.

शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची युवराजने नुकतीच भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांच्या प्रक्रियेवर कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे, युवराजला आता घर मिळणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय. सध्या युवराजला म्हाडातर्फे घर देता येऊ शकेल का, याची चाचपणी केली जातेय. मात्र खेळाडूंसाठी म्हाडाकडे कोणताही कोटा नसल्याने त्याला सर्वसामान्य लोकांच्या यादीत घरासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे. मात्र एवढं करुनही आपल्या हक्काचं घर मिळेल, याची शाश्वती कोणीही युवराजला दिलेली नाही.

गेल्या सहा वर्षांमध्ये युवराजने प्रत्येक राजकीय पक्षांकडे आपली व्यथा मांडली. मात्र अनास्थेशिवाय त्याच्या पदरात काही पडलं नाही. युवराजचा भाऊ देवेंद्र वाल्मिकीने गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. पी. व्ही. सिंधूसोबत देवेंद्र वाल्मिकीला राज्य सरकारने बक्षिसाची घोषणा केली. मात्र माझ्याप्रमाणे माझ्या भावाच्या पदरीही निराशाच आल्याचं युवराजने ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

सध्या युवराज २८ वर्षांचा आहे. मात्र आपल्या कारकिर्दीतला उमेदीचा काळ आपण घरासाठी वणवण करण्यात वाया घालवल्याची खंत युवराजने बोलून दाखवली. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये हॉकी खेळाडूंसाठी अॅस्ट्रोटर्फची मैदानं तयार करण्यात आली आहेत. नवीन अकादमी सुरु करण्यात आल्या आहेत. उत्तरेकडच्या राज्यांमधील सरकार हॉकीपटूंना घसघशीत पगाराची नोकरी, घर आणि अन्य सुविधांची बरसात करतं. मात्र महाराष्ट्राचं क्रीडा धोरण या बाबतीत दुर्दैवाने अत्यंत तकलादू असल्याचं युवराजने मान्य केलं.

गेली अनेक वर्षे युवराज दुखापतीमुळे भारतीय हॉकी संघात खेळत नाहीये. सध्या त्याचं भारतीय संघात पुनरागमन होणं दुरापास्त मानलं जातंय. मात्र राष्ट्रीय स्तरावर युवराज हॉकी खेळतोय. या व्यतिरिक्त मुंबईतील गरीब मुलांना स्वखर्चाने हॉकी शिकवण्याची जबाबदारी युवराजने स्वीकारली आहे. पण सहा वर्षे घरासाठी जो मनस्ताप सहन करावा लागला, तो इतर खेळाडूंना भोगावा लागू नये, यासाठी युवराजला प्रयत्न करायचे आहेत. काही वर्षांनी मुंबईत स्वतःची हॉकी अकादमी सुरु करण्याचा युवराजचा मानस आहे. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला करायला जमली नाही, ती गोष्ट राज्यातले दुसरे युवराज आणि देवेंद्र करतील असा आत्मविश्वास युवराजने बोलून दाखवला.