प्रो-कबड्डीमधील पुणेरी पलटण संघातील अक्षय जाधवची खंत

प्रत्येक आई-बाबा आपल्या मुलांबाबत काही स्वप्ने पाहतात. ती स्वप्ने सत्यात उतरल्यावरचा आनंद काही औरच असतो. शेतकरी कुटुंबातील अक्षयच्या बाबांनीही असेच एक स्वप्न पाहिले. आपला मुलगा यशस्वी कबड्डीपटू व्हावा, मोठय़ा स्पर्धामध्ये खेळावा, नाव कमवावे, हे स्वप्न साकारण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. स्वप्न सत्यामध्ये उतरण्याची वेळ आलीही. काही दिवसांमध्येच अक्षय प्रो-कबड्डीमध्ये खेळणार होता. ही बातमी त्यांना समजली, त्यांच्या  आनंदाश्रूंना पूर आला होता. पण ही स्पर्धा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आणि हे साकारलेले स्वप्न पाहण्यासाठी ते या जगात राहिले नाहीत. ‘प्रो कबड्डीसारख्या लोकप्रिय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळावी हे माझ्या बाबांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाले, मात्र माझा खेळ पाहण्यासाठी ते हयात नाहीत याचेच दु:ख मला जाणवत आहे, असे पुणेरी पलटण संघाचा खेळाडू अक्षय जाधवने सांगितले.

अक्षय हा गडहिंग्लज परिसरातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला खेळाडू. कबड्डीचे बाळकडू त्याला आजोबा व बाबांकडून लाभले. त्याचे वडील चंद्रकांत हे अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा संघाकडून खेळत असत. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच अक्षयनेही कबड्डीतच कारकीर्द घडवण्याचा निश्चय केला. वयाच्या १३व्या वर्षी त्याने खेळाचा सराव सुरू केला. त्याने आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. गेली दोन वर्षे तो पुण्याच्या सतेज क्लबकडून खेळतो. महाराष्ट्राकडून खेळताना हरयाणाविरुद्ध त्याने चांगल्या चढाया केल्या होत्या. त्यामुळेच त्याला पुणेरी पलटण संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याची चढाईपटू म्हणून निवड झाली आहे.

अक्षय म्हणाला की, ‘सतेज संघाकडूनच मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यामुळेच पुणेरी पलटण संघात निवड झाली. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. हा संघ म्हणजे एक कुटुंबच आहे. संघात मी सर्वात लहान खेळाडू असल्यामुळे सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती. मात्र सर्वच सहकारी माझी खूप काळजी घेत असल्यामुळे ही भीती दूर झाली आहे. कर्णधार मनजीत चिल्लरसह सर्वाचे मला खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे. सरावामध्ये सांघिक कौशल्यावर भर देत आहोत.’

‘पुणे संघाचे मुख्य प्रशिक्षक अशोक शिंदे व सहायक प्रशिक्षक भास्करन हे माझ्यासाठी केवळ गुरू नसून वडीलही आहेत. या दोघांकडून वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत आहे. चढाईच्या वेळी कसा वेग ठेवावा, हुलकावणी कशी द्यावी, खोलवर पाय कसा टाकावा आदींबाबत त्यांच्याकडून बहुमोल सूचना मिळत आहेत. मैदानावर व मैदानाबाहेर कसे वर्तन ठेवावे याबाबतही त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ही शिकवणीची शिदोरी मला जीवनासाठीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे,’ असेही अक्षयने सांगितले.