ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर कोहलीच्या समर्थनार्थ ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन मैदानात उतरले आहेत. ‘बिग बी’ यांनी कोहलीच्या पाठिशी उभं राहून ऑस्ट्रेलियन माध्यमांवर खोचक टीका केली.

ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी विराटला क्रिडा क्षेत्रातील डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले खरंतर त्यांचे आभार मानायला हवेत. कारण, या विधानातून कोहली विजेता आणि अध्यक्ष असल्याचे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी एकाप्रकारे मान्य केले आहे. ऑस्ट्रेलियातील माध्यमांचे त्याबद्दल जाहीर आभार, असे खोचक ट्विट अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर केले.

वाचा: ‘कोहली म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रातील ट्रम्प!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत गेल्या काही दिवसांत मैदानात घडलेल्या काही प्रसंगामुळे कोहली चर्चेचे केंद्रस्थान बनला आहे. स्लेजिंग ते प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत झालेली बाचाबाची या प्रसंगांमुळे कोहलीवर ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून टीका करण्यात आली. दोन संघांमधील हा मुकाबला प्रत्यक्षात ‘कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ’ अशा खडाजंगीत परावर्तित झाला आहे. रांची कसोटीत पराभवाची टांगती तलवार डोक्यावर असताना ऑस्ट्रेलियन संघाने झुंजार खेळ करत कसोटी अनिर्णित राखली. या झुंजार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी संघाचे कौतुक करताना विराट कोहलीला उद्देशून विखारी टीका केली. ‘कोहली म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रातील डोनाल्ड ट्रम्प आहेत,’अशी बोचरी टीका ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी केली आहे. तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ओळखले जातात. कोहलीची तुलना ट्रम्प यांच्याशी केल्याने कोहली वि. ऑस्ट्रेलिया या वादाची राळ नव्याने उडण्याची शक्यता आहे.