टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळे यांनी मंगळवारी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी नाराजी करत कुंबळेविषयी तक्रार करणाऱ्या खेळाडूंचे कान टोचले आहेत. कुंबळे शिस्तबद्ध आहे. हीच बाब खेळाडूंना खटकत होती. शिस्तीचे पालन न करणारे खेळाडूच त्याच्यावर नाराज होते आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा प्रशिक्षक हवा होता, असा ‘मास्टरस्ट्रोक’ त्यांनी लगावला.

कुंबळेविषयी तक्रार करणाऱ्या खेळाडूंना गावसकर यांनी चांगलेच सुनावले आहे. आज सराव नाही केला तरी चालेल, तुम्हाला बरं वाटत नाही, सुट्टी घ्या आणि शॉपिंग करा, असं म्हणणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा का, असा सवाल गावसकर यांनी खेळाडूंना केला. कुंबळे शिस्तबद्ध आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. त्यामुळं कुंबळेविषयी तक्रार करणाऱ्या खेळाडूंनी खुशाल संघाबाहेर पडावं, असा रागही त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंसमोर नतमस्तक तरी व्हावं लागेल किंवा अनिल कुंबळेसारखं पद तरी सोडावं लागेल, असा संदेश संभाव्य प्रशिक्षकाला यातून मिळाला आहे. ही खूपच दुःखद बाब आहे, असंही गावसकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन-तीनपेक्षा अधिक लोकांच्या गटात मतभेद नेहमीच पाहायला मिळतात. तणावपूर्ण परिस्थितीत असं होतं. कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा पदभार सांभाळल्यानंतर टीम इंडियानं चांगलं यश मिळवलं. एका वर्षात कुंबळेनं काही चुकीचं केलंय, असा मला तरी वाटत नाही. त्यानंतरही कुंबळेला राजीनामा द्यावा लागला. याचाच अर्थ त्या गटात आणि कुंबळेमध्ये नक्कीच काही तरी घडलं असावं, असंही ते म्हणाले. तत्पूर्वी राजीनाम्यानंतर कुंबळेनं फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. माझी आणि विराटची भागिदारी न टिकणारी होती. कोहलीला माझी कार्यपद्धती आवडत नव्हती. विशेष म्हणजे बीसीसीआयकडून एक दिवस आधीच मला याबद्दलची माहिती मिळाली होती, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. माझी कार्यपद्धती पटत नसल्यानं कोहलीला मी संघाच्या प्रशिक्षकपदी नको होतो. बीसीसीआयने आमच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती. बीसीसीआयने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी आभारी आहे, असंही त्यानं या पोस्टमध्ये म्हटलंय.