भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना मंगळवारी अजून एक धक्का बसला. श्रीनिवासन यांच्या विश्वासू आणि बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांचे बडोदा क्रिकेट असोसिएशनने पैशांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.
बडोद्याचे ड्रेसिंग रुम आणि असोसिएशनच्या कार्यालयाच्या नुतनीकरणारासाठी २५ लाख रुपयांचा ठराव करण्यात आला होता. पण याचा खर्च तब्बल ८९ लाख रुपये दाखवला आल्याने यामध्ये पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळेच पटेल यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून त्यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
‘‘ पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी पटेल यांच्या सदस्यत्वाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.  याप्रकरणी असोसिएशनचे संयुक्त सचिव अरुण गांधी आणि खजिनदार सचिन दळवी यांनी अनंत तेंडुलकर यांच्या अध्यक्षपदाखाली चौकशी समिती नेमली होती आणि या समितीने याबाबतचा अहवाल सादर केला आहे,’’ असे बडोद्याचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी सांगतिले.