लोढा समितीच्या शिफारशींपासून आम्ही पळ काढत नाही, पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला थोडा अवधी देण्याची गरज आहे, असे वक्तव्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी केले आहे.
लोढा समितीच्या शिफारशींची अंमजबजावणी महिन्याभरात करण्यात यावी, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला आहे. याबाबत ठाकूर म्हणाले की, ‘‘आम्हालाही बाजू मांडण्याचा हक्क आहे. बीसीसीआयमध्ये पारदर्शकता असायला हवी आणि हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहेच. गेल्या नऊ महिन्यांपासून आम्ही व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत, त्याचे परिणामही दिसून येत आहेत. लोढा समितीने बऱ्याच शिफारशी केल्या आहेत आणि प्रत्येक सदस्याला ते पाहण्याचा हक्क आहे.’’
ठाकूर पुढे म्हणाले की, ‘‘भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला होता. तेव्हा विश्वविजेत्या संघाला पारितोषिक देण्यासाठी पैसे मंडळाकडे नव्हते. पण आता ही स्थिती बदललेली आहे. या गोष्टींचाही योग्य तो विचार करायला हवा.’’
सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असले तरी बीसीसीआयच्या धुरीणांना ही गोष्ट पटलेली नाही. या शिफारशींबाबत त्यांच्या मनात नाराजी आहे. या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी रविवारी बीसीसीआयच्या विधी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या सदस्य संघटनांनी फेब्रुवारीमध्ये या संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
लोढा समितीच्या अहवालाबाबत ठाकूर म्हणाले की, ‘‘लोढा यांनी सादर केलेला शिफारशींचा अहवाल हा काही एका पानाचा नाही. जर लोढा समिती आपला अहवाल बनवण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, तर तो अहवाल समजून घेण्यासाठी आणि त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी दोन महिन्यांचा तरी अवधी आम्हाला द्यायला हवा. काही संघटनांनी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे ठरवले आहे. या सभेत चर्चा करून ते आम्हाला याबाबत त्यांची मते सांगणार आहेत.’’
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. बीसीसीआयमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाईट गोष्टी घडल्या आणि त्याचा फटका मंडळाला बसल्याचे ठाकूर यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले की, ‘‘जे काही वाईट घडले त्याचा फाटका बीसीसीआयला बसला आहे. काही व्यक्तींच्या चुकांमुळे बीसीसीआयच्या प्रतिमेला तडा गेला आहे. पण बीसीसीआयची प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही करीत आहोत.’’
परस्पर हितसंबंधांच्या मुद्दय़ावर ठाकूर म्हणाले की, ‘‘केव्हिन पीटरसन ज्या ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळतो तिथेच तो समाचोलनही करताना दिसतो. अन्य क्रिकेट मंडळांचे खेळाडू असे करताना दिसत आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये बदल होतच
असतात, बीसीसीआयमध्येही ते होत आहेत.’’