मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने नरसिंग यादवची ऑलिम्पिकवारी हुकण्याची शक्यता आहे. मात्र, नरसिंग यादवने हे त्याच्याविरुद्ध रचण्यात आलेले कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनीही नरसिंग यादवला पाठिंबा दिला आहे. विधानसभेत आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नरसिंग यादवला सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, नरसिंग यादवच्या उत्तेजक चाचणीचे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. आमचा नरसिंग यादवला पूर्ण पाठिंबा आहे. याप्रकरणी क्रीडामंत्र्यांना पत्र पाठविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा: सुशीलपेक्षा नरसिंगच योग्य; न्यायालयामध्ये महासंघाची भूमिका

काही दिवसांपूर्वी रिओ ऑलिम्पिकला सुशीलकुमार जाणार की नरसिंग यादव यावरुन चढाओढ सुरु होती. अखेर न्यायालयाने नरसिंगच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र आता नरसिंग हा डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्ताने कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पदक पटकावून ऑलिम्पिकचा कोटा मिळवणारा नरसिंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कुस्तीपटूला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवून ऑलिम्पिकचा कोटा मिळवता आलेला नाही. मात्र, भारताचा कुस्तीपटू नरसिंग पंचम यादवचा यंदाचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभाग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडला आहे. नाडा अर्थात नॅशनल अॅण्टी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत ५ जुलै रोजी चाचणी केली होती. ७४ किलो फ्रीस्टाईल गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारा नरसिंग उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढल्याचे सांगितले जात आहे.

वाचा: हे माझ्याविरुद्ध रचलेले कट कारस्थान- नरसिंग यादव