डेव्हिस चषकात नेहमीच शानदार प्रदर्शन करणाऱ्या सोमदेव देववर्मनने लौकिकाला जागत सर्बियाच्या दुसान लाजोव्हिकवर सनसनाटी विजय मिळवला. सोमदेवच्या या आश्चर्यकारक विजयामुळेच भारताने सर्बियाविरुद्धचे आव्हान जिवंत राखले. मात्र निर्णायक लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने आता सोमवारी अर्थात राखीव दिवशी विजेता कोण याचा फैसला होणार आहे.
लिएण्डर पेसने शनिवारी झालेल्या दुहेरीच्या लढतीत संघर्षपूर्ण विजय मिळवत युवा खेळाडूंसमोर आदर्श ठेवला होता. त्यातूनच प्रेरणा घेत सोमदेवने लाजोविकला साडेतीन तासांच्या मॅरेथॉन लढतीत १-६, ६-४, ४-६, ६-३, ६-२ असे नमवले.
पहिल्या सेटमध्ये सोमदेव याला सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याची सव्‍‌र्हिस दोन वेळा तोडून लाजोविक याने हा सेट सहज जिंकला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये सूर गवसलेल्या सोमदेवने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत लाजोविक याची सव्‍‌र्हिस भेदली. हा सेट घेत त्याने सामन्यातील रंगत कायम ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये लाजोविकने जमिनीलगत फटक्यांबरोबरच नेटजवळून प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. त्याने सव्‍‌र्हिसब्रेकही मिळविला. हा सेट त्याने ४८ मिनिटांत जिंकला. चौथ्या गेममध्ये पुन्हा सोमदेवला लय सापडली. त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवीत ५-३ अशी आघाडी घेतली व पाठोपाठ आपली सव्‍‌र्हिस राखली. हा सेट घेत त्याने सामन्यातील उत्कंठा शिगेला नेली. पाचव्या सेटमध्ये लाजोविकच्या चुकांचा फायदा उठवत सोमदेवने थरारक विजय साकारला. सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष केला.
अखेरच्या एकेरी लढतीत फिलिपने पहिल्या सेटमधील सुरुवातीला सव्‍‌र्हिसब्रेक मिळवत ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने सव्‍‌र्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण मिळवत पहिला सेट ६-३ असा घेतला. त्याने फोरहँडच्या क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग केला. दुसऱ्या सेटमध्ये पाचव्या गेमच्या वेळी त्याने युकीची सव्‍‌र्हिस तोडली व ३-२ अशी आघाडी घेतली. मात्र आठव्या गेमच्या वेळी फिलिपने बॅकहँड फटक्यांबाबत केलेल्या चुकांचा युकीला फायदा झाला. त्याचा लाभ घेत युकीने सव्‍‌र्हिसब्रेक करीत ४-४ अशी बरोबरी केली. पावसाचा जोर वाढल्याने खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.