चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी आणि आर.अश्विनच्या अर्धशकाच्या जोरावर भारताने ३०० धावांचा टप्पा पार करत पहिल्या डावात इंग्लंडसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यामधील दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. मात्र, दुपारपर्यंत ७७ धावांच्या बदल्यात प्रग्यान ओझाने दोन बळी मिळवले होते.
पहिल्या डावात इंग्लंडच्या माँटी पानेसरने पाच आणि ग्रॅमी स्वानने चार बळी मिळविले. भारताचा निम्मा संघ अवघ्या ११९ धावांवर गारद झाल्यानंतर भारताला ३०० धावांचेही लक्ष गाठता येईल की नाही याबाबत शंका होती. मात्र, पुजारा आणि आर. अश्विनने भारताचा डाव सावरला. गेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाने तीन शतके झळकावली असून त्याच्याकडे प्रति राहूल द्रविड म्हणून पाहिले जात आहे. सर्वात शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या झहीर खानने एक चौकार आणि एक षटकार मारून धावा करण्याचा प्रयत्न केला. परंतू, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे झहीर बाद झाला आणि भारताचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला.   
पहिल्या डावात गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणी या स्टार फलंदाजांपैकी कुणीच आपला करिष्मा दाखवू शकले नाहीत, त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दुस-या डावाकडे लागले आहे.