फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून ३-० अशी हार पत्करावी लागली. तर दुसऱ्या सामन्यात कोलंबियाने भारताची झुंज २-१ अशी मोडून काढली. सलग दोन पराभवांमुळे भारताचं बाद फेरीतलं स्थान धोक्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही बाद फेरीत प्रवेश करण्याची भारताला अजुनही संधी आहे. मात्र बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला १२ तारखेला होणाऱ्या घानाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगला खेळ केला. सुरुवातीच्या सत्रात कोलंबियाचं आक्रमण थोपवण्यात भारतीय गोलकिपर धीरजला यश आलं. भारतीय खेळाडूंनीही कोलंबियाच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताचे दोनही प्रयत्न फोल ठरले. दुसऱ्या सत्रात कोलंबियाने सामन्यातला पहिला गोल झळकावत आघाडी घेतली. त्यानंतर काही अंतराने भारताच्या जॅकसन सिंहने गोल करत आपल्या संघाला बरोबरी मिळवून दिली. पण भारताचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. कोलंबियाने लगेचच दुसरा गोल करत सामन्यातला आपला विजय नक्की केला.

याच कामगिरीमुळे भारताच्या बाद फेरीत प्रवेश करण्याचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यात अमेरिकेने घानाला १-० ने हरवल्याने भारताला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी निर्माण झाली आहे. यासाठी भारताला घानावर विजय मिळवणं हे अत्यावश्यक आहे. याचसोबत अमेरिकेने आपल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात कोलंबियाला पराभूत केल्यास भारताला बाद फेरीत प्रवेश मिळू शकतो.

बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हे ३ निकष प्रामुख्याने सर्व संघांना लागू आहेत.

१. साखळी फेरीतील सर्व सामन्यांमधून मिळणारे गुण

२. साखळी फेरीतील सर्व सामन्यांमधला गोलफरक

३. साखळी फेरीतील सर्व सामन्यांमध्ये केलेले गोल

त्यामुळे भारताला कोलंबियावर विजय मिळवताना आपल्या विजयाचं अंतर हे मोठं ठेवावं लागणार आहे. उदाहरणार्थ घानाला किमान ४ गोलच्या फरकाने हरवल्यास भारताला बाद फेरीत प्रवेश मिळणार आहे. निसटता विजय भारतासाठी बाद फेरीची दारं बंद करु शकतो. याचसोबत अमेरिकेनेही कोलंबियाला किमान दोन गोलच्या फरकाने हरवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सर्व योग जुळून आले तर भारताला फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे उद्या होणाऱ्या घानाविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.