रिओ ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला एक आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिली आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. योगेश्वरला याच लढतीसाठी आता रौप्य पदक मिळणार आहे. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला देण्यात येणार आहे. रिओ ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीमुळे नाराज असलेल्या योगेश्वरला यामुळे सुखद धक्का बसला आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलोग्रॅम फ्री स्टाइल वजनी गटात रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्य तर योगेश्वरला कांस्य पदक मिळाले होते. कुदुखोवचा २०१३ साली वयाच्या २७ व्या वर्षी रशियामध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. परंतु याच महिन्यात रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यापूर्वी आयओसीने लंडन ऑलिम्पिक दरम्यानच्या खेळाडूंच्या सॅम्पलची पुन्हा एकदा तपासणी केली होती. हे सॅम्पल १० वर्षांपर्यंत ठेवले जाते. जर एखाद्या खेळाडूने चुकीच्या पद्धतीने यश मिळवले असेल तर या चाचणीतून ते समोर येईल असा आयओसीचा उद्देश आहे. या नियमांतर्गतच कुदुखोव्हच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी घेण्यासत आली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे रौप्य पदक योगेश्वर दत्तला मिळेल. हे पदक मिळाल्यानंतर योगेश्वरही भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशीलकुमार, नेमबाज विजयकुमार यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत रौप्य पदक पटकावणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.