भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी टीम इंडियाचा हरहुन्नरी खेळाडू हार्दिक पांड्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे. “आगामी काळात पांड्या भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. यासाठी त्याला सतत सर्वोत्तम कामगिरी करत राहण्याची गरज आहे.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी आपलं मत मांडलं.

गेल्या वर्षभरात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने बजावलेली कामगिरी हा सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनलेली आहे. भारतामधल्या हजारो खेळाडूंप्रमाणे पांड्याने आयपीएलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने संघाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. अनेक प्रयत्नांनंतर हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात जागा मिळाली.

गेल्या काही दिवसात भारताच्या जलदगती गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीबद्दल कपील देव यांना विचारलं असता, “सध्या भारत आपल्या जलदगती गोलंदाजांवर अवलंबून आहे. ज्या खेळाडूंना आता संघात जागा मिळत नाहीये, त्यांनाही ज्यादिवशी संघात जागा मिळेल ते सर्वोत्तम कामगिरी करतील”, असं कपील देव म्हणाले. सध्याचा भारताचा संघ हा तरुण आहे, आणि आगामी काळात हा संघ भारतासाठी आणखी चांगली कामगिरी करु शकतो, असंही कपिल देव म्हणाले.

तिसऱ्या कसोटीनंतर श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या या दौऱ्यांमध्ये कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.