दिनांक : १० जून १९८६    स्थळ : लॉर्ड्स
लॉर्ड्सवर २५ जून १९८३ या दिवशी भारताने इतिहास घडवला होता. वेस्ट इंडिजचे संस्थान खालसा करत पहिल्यांदाच अनपेक्षितपणे विश्वविजयाचा अद्भुतानुभव दिला. त्यानंतर तीन वर्षांनी भारताने क्रिकेटच्या पंढरीत पहिल्यांदाच कसोटी विजयाची चव चाखली. पण गेल्या १७ सामन्यांमधील लॉर्ड्सवरचा हा एकमेव विजय, तर ११ पराभव भारताच्या पदरी पडले होते. पण महेंद्रसिंग धोनीच्या युवा शिलेदारांनी तब्बल २८ वर्षांनी क्रिकेटच्या पंढरीत विजयाची पताका फडकावली आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली.
लॉर्ड्सवरील १९८६च्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने नाणेफेक जिंकत इंग्लंडला फलंदाजीला पाचारण केले. सलामीवीर ग्रॅहम गुचची दमदार ११४ धावांची खेळी आणि डेरेक प्रिंगलच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने २९४ धावांची मजल मारली. चेतन शर्माने पहिल्या डावात पाच बळी मिळवले होते. भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली ती ‘लॉर्ड ऑफ दी लॉर्ड्स’ संबोधल्या जाणाऱ्या दिलीप वेंगसरकरच्या शतकाच्या जोरावर. लॉर्ड्सवरील त्याच्या तीन शतकांपैकी हे एक शतक संस्मरणीय ठरले. १६ चौकारांच्या जोरावर त्याने नाबाद १२६ धावांची खेळी साकारली होती. वेंगसरकरचे शतक आणि मोहिंदर अमरनाथच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने ४७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात कपिल देवने कमाल केली. ग्रॅहम गुच, टीम रॉबिनसन, कर्णधार डेव्हिड ग्रोव्हर आणि डेरेक प्रिंगल यांना बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले आणि त्यांचा दुसरा डाव १८० धावांवर संपुष्टात आला. विजयासाठी १३४ धावांचे माफक लक्ष्य समोर वाटत असले तरी यावेळी इंग्लंडने भेदक मारा करत भारताच्या नाकीनऊ आणले होते. यावेळी संघाच्या विजयासाठी कपिल देव धावून आला आणि त्याने अवघ्या १० चेंडूंत ४ चौकार व एका षटकाराच्या जोरावर नाबाद २३ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : १२८.२ षटकांत सर्वबाद २९४ (ग्रॅहम गुच ११४; चेतन शर्मा ५/६४)
भारत (पहिला डाव) : १३७ षटकांत सर्वबाद ३४१ (दिलीप वेंगसरकर १२६*; डेरेक प्रिंगल ३/५८)
इंग्लंड (दुसरा डाव) : ९६.४ षटकांत सर्वबाद १८० (माइक गेटिंग ४०; कपिल देव ४/५२)
भारत (दुसरा डाव) : ४२ षटकांत ५ बाद १३६ (दिलीप वेंगसरकर ३३; ग्रॅहम डिली २/२८)
निकाल : भारत पाच विकेट्सने विजयी
सामनावीर : कपिल देव.