इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही सामन्यांमध्ये वर्चस्व राखल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारताला अव्वल स्थान मिळवता आले.
‘‘झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेतील हरारेमध्ये झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला, तर दुसरीकडे भारताने इंग्लंडला पराभूत केल्याने विश्वविजेत्यांची अव्वल स्थानावर वर्णी लागली आहे,’’ असे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
नॉटिंगहॅममधील सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाशी क्रमवारीत अव्वल स्थानी ११४ गुणांनिशी बरोबरी केली होती. पण त्यानंतर भारताने इंग्लंडला तिसऱ्या सामन्यात पराभूत केले, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागल्याने ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान गमवावे लागले. या पराभवाने ऑस्ट्रेलियाचे १११ गुण झाले असून ते दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यानंतर चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.