भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी पुन्हा एकदा देशाची मान उंचावणारी कामगिरी करुन दाखवली आहे. भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी ऑस्ट्रियातील विशेष जागतिक हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ७३ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ३७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. १०५ देशांमधून तब्बल २ हजार ६०० खेळाडू सहभागी असलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावणारे भारतीय खेळाडू आज मायदेशी परतणार आहेत.

दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात येणारी जागतिक हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा १८ ते २४ मार्च दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संपन्न झाली. यामध्ये भारतीय खेळाडूंनी ३४ सुवर्ण पदकांसह १० रौप्य आणि २६ कांस्य पदकांची कमाई केली. अल्पाईन स्कीईंग, स्नो बोर्डिंग, स्नो शुईंग , फिगर स्केटिंग, स्पीड स्केटिंग, फ्लोर हॉकी या खेळांचा समावेश असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली.

भारतीय पुरुषांनी युनिफाईड फ्लोअरबॉलमध्ये नायजेरियाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. तर फ्लोअर हॉकीमध्ये भारतीय संघाने लिथुएनियाचा ७-२ असा मोठ्या फरकाने पराभव केला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय पुरुषांनी यजमान ऑस्ट्रियाचा ८-० असा धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील पदकांची संख्या ७३ वर नेली.

भारताने अल्पाईन स्कीईंगमध्येही पदकांची लयलूट केली. ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह भारताने अल्पाईन स्कीईंगमध्ये १० पदकांची कमाई केली. तर स्नो बोर्डिंगमध्ये भारतीय संघाने ८ पदके पटकावली. यामध्ये ४ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश होता. स्नो शुईंगमध्येही भारतीय खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी केली. या प्रकारात भारताने एकूण ५ पदकांवर नाव कोरले. यामध्ये २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश होता. स्पीड आणि फिगर स्केटिंगमध्ये भारताने ३ रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण ४ पदके मिळवली.