भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य यायला हवे. त्यासाठी संघात एका डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे, असे मत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले आहे.

झहीर खानच्या निवृत्तीनंतर भारताला चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला नाही. आशीष नेहराने काही काळ मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भेदक मारा केला, पण दुखापतीमुळे तोदेखील संघाच्या बाहेर आहे. जयदेव उनाडकटनेही संघात स्थान पटकावले होते, पण कामगिरीत सातत्य नसल्यामुळे त्यालाही डच्चू देण्यात आला.

बरिंदर सरण आणि अनिकेत चौधरी हे परिपक्व नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. त्यामुळे भारतीय ‘अ’ संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याशी अरुण चर्चा करणार आहेत.

‘ङभारताकडे मनगटाच्या जोरावर चेंडू फिरवणारे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलसारखे युवा फिरकीपटू आहेत. त्यामुळे भारताला सध्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे. आताच्या घडीला जर चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला तर २०१९च्या विश्वचषकासाठी आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल,’’ असे अरुण यांनी सांगितले.