लॉर्ड्स कसोटीचा चौथा दिवस नाटय़ापूर्ण घडामोडींनी रंगला असला तरी या दिवसावर भारताचेच वर्चस्व दिसून आले. मुरली विजयचे हुकलेले शतक, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांची अर्धशतके व इशांत शर्माचा भेदक मारा, हे रविवारचे वैशिष्ठय़ ठरले. ढगाळ वातावरणातील या सामन्यात यजमान इंग्लंडवर पराभवाचे ढग जमा झाले असून भारतीय संघ मात्र विजयासमीप येऊन पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या ४ बाद १०५ धावा झाल्या असून भारतीय संघाला विजयासाठी ६ विकेट्सची आवश्यकता आहे तर इंग्लंडला अजूनही २१४ धावांची गरज आहे. मुरली विजय, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार या तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने ३१८ धावांची निर्णायक आघाडी मिळवली. चौथ्या डावात आव्हानात्मक लक्ष्य मिळालेल्या इंग्लंडने अ‍ॅलिस्टर कुक आणि इयान बेल यांना गमावल्याने भारताने ऐतिहासिक विजयाची भक्कम पायाभरणी केली.
तत्पूर्वी ४ बाद १६९ वरुन पुढे खेळणाऱ्या भारताला कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (१९)रुपात पहिला धक्का बसला. सलामीवीर मुरली विजयाच्या संयमी खेळीला यावेळी शतकाची झालर लागू शकली नाही, फक्त पाच धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने ११ चौकारांच्या जोरावर २४७ चेंडूंचा सामना करत ९५ धावांची खेळी साकारली. भारताची आघाडी मर्यादित राखत आगेकूच करण्याची इंग्लंडला संधी होती. पण रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी आठव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करत भारताची आघाडी तीनशेचा आकडा ओलांडेल याचा काळजी घेतली. रवींद्र जडेजाने ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या शैलीत गोलंदाजांवर चौफेर मारा करत ९ चौकारांसह ६८ धावा फटकावल्या, तर भुवनेश्वर कुमारने ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी साकारली. मालिकेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक
ठरले.
विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य मिळालेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. रवींद्र जडेजाने सॅम रॉबसनचा (७)अडसर सातव्याच षटकात दूर केला. दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत अ‍ॅलिस्टर कुक (२२) आणि गॅरी बॅलन्स (२७) जोडीने डाव सावरला. मात्र मोहम्मद शमीने बॅलन्सला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर इशांत शर्माने इयान बेलला (१) झटपट माघारी धाडले. खेळपट्टीवर ठाण मांडलेल्या कुकला बाद करत इशांत शर्माने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. मोइन अली आणि जो रुट जोडीने पडझड थांबवली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुट १४  तर मोइन अली १५ धावांवर खेळत होते.
धावफलक
भारत पहिला डाव २९५, इंग्लंड पहिला डाव ३१९,
भारत दुसरा डाव: मुरली विजय झे.प्रायर गो.अँडरसन ९५, शिखर धवन झे.रुट गो.स्टोक्स ३१, चेतेश्वर पुजारा झे.प्रायर गो.प्लंकेट ४३, विराट कोहली त्रि.गो.प्लंकेट ०, अजिंक्य रहाणे झे.प्रायर गो.ब्रॉड ५, महेंद्रसिंह धोनी झे.बेल गो.प्लंकेट १९, स्टुअर्ट बिन्नी झे.कूक गो.अली ०, रवींद्र जडेजा झे.कूक गो.स्टोक्स ६८, भुवनेश्वरकुमार झे.बेल गो.स्टोक्स ५२, मोहम्मद शमी झे.प्रायर गो.अली ०, इशांत शर्मा नाबाद २, अवांतर (बाईज १९, लेगबाईज ९, वाईड १) २९, एकूण १०३.१ षटकांत सर्वबाद ३४२.
बाद क्रम : १-४०, २-११८, ३-११८, ४-१२३, ५-२०२, ६-२०३, ७-२३५, ८-३३४, ९-३३८, १०-३४२.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २९-११-७७-१, स्टुअर्ट ब्रॉड २३-६-९३-१, बेन स्टोक्स १८.१-२-५१-३, लायम प्लंकेट २२-६-६५-३, मोईन अली ११-३-२८-२.
इंग्लंड दुसरा डाव : अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. इशांत शर्मा २२, सॅम रॉबसन पायचीत गो. जडेजा ७, गॅरी बॅलन्स झे. धोनी. गो. मोहम्मद शमी २७, इयान बेल त्रि.गो. इशांत शर्मा १, जो रुट खेळत आहे १४, मोइन अली खेळत आहे १५  अवांतर (बाइज ५, लेगबाइज १३, वाइड १)१९ , एकूण ४६ षटकांत ४ बाद १०५
बादक्रम : १-१२, २-७०, ३-७१, ४-७२.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-४-१०-०, मोहम्मद शमी ७-१-२०-१, इशांत शर्मा १०-५-१३-२, रवींद्र जडेजा १६-४-३२-१, मुरली विजय ४-१-११-०, शिखर धवन १-०-१-०.