श्रीलंकेच्या भूमीवर तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भारतीय संघाने उराशी बाळगले आहे. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर म्हणजेच एसएससी स्टेडियमवरील हा सामना म्हणजे युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही संघांसाठी जणू अग्निपरीक्षाच असणार आहे.
पी. सारा ओव्हल स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा २७८ धावांनी पराभव केला आणि विराट कोहलीने कर्णधार म्हणून पहिल्या विजयाची नोंद केली. आता हा नवा संघनायक पहिल्यावहिल्या मालिका विजयासाठी उत्सुक आहे. १९९३ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेत १-० अशा फरकाने कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला होता.
कोहलीने पाच गोलंदाज खेळवण्याची रणनीती वापरली, परंतु दोन्ही सामन्यांत वेगळे निकाल पाहायला मिळाले. गॉलच्या पहिल्या कसोटीत तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्कल लढवली. मग कोलंबोत हरभजन सिंगऐवजी स्टुअर्ट बिन्नीला संघात स्थान दिले. दोन्ही कसोटी सामन्यांत मिळून श्रीलंकेचे सर्व ४० बळी भारतीय गोलंदाजांनी घेतले.
रवीचंद्रन अश्विनची फिरकी प्रभावी ठरत आहे. चार डावांत त्याच्या खात्यावर १७ बळी जमा आहेत. कोलंबोत श्रीलंकेचा दुसरा डाव भारताने फक्त १३४ धावांत गुंडाळला. यापैकी निम्मा संघ तंबूत पाठवण्याची किमया अश्विनचीच. अमित मिश्राची त्याला छान साथ लाभत आहे. त्याच्या खात्यावर १२ बळी जमा आहेत. लंकेच्या फलंदाजांना अश्विन-मिश्राच्या फिरकी माऱ्याला सामोरे जाणे कठीण जात आहे. याशिवाय इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी दुसऱ्या कसोटीत वेगवान माऱ्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तिसऱ्या कसोटीत भारताचा गोलंदाजीचा मारा कायम ठेवण्यात येणार आहे.
फलंदाजीच्या क्रमात मात्र भारताला काही बदल करण्याशिवाय पर्याय नसेल. मुरली विजय आणि शिखर धवन दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने लोकेश राहुल सोबत चेतेश्वर पुजारा भारताच्या डावाला प्रारंभ करण्याची शक्यता आहे. सौराष्ट्रचा शैलीदार फलंदाज पुजाराला पहिल्या दोन सामन्यांत संधी मिळाली नव्हती. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकाला न्याय देत आहे. रोहित शर्माला पाचव्या क्रमांकावर स्थान दिल्याने त्यालाही सूर गवसला आहे. मात्र पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय झाल्यास पुजाराला संघात स्थान मिळू शकणार नाही. याचप्रमाणे ३२ वर्षीय यष्टीरक्षक नमन ओझा हासुद्धा सलामीसाठी चांगला पर्याय असू शकेल. मात्र करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही.
अनुभवी फलंदाज कुमार संगकारा दोन कसोटी सामन्यांनंतर निवृत्त झाल्यामुळे श्रीलंकेची फलंदाजी कमकुवत झाली आहे. मालिकेतील महत्त्वाच्या सामन्याच्या दृष्टीने त्यांना महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. उपुल थरंगा संगकाराच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. थरंगा हासुद्धा डावखुरा फलंदाज असला तरी त्याची अश्विनविरुद्धची कामगिरी मात्र चिंताजनक आहे. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज चौथ्या तर लहिरू थिरिमाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. अश्विनच्या १७ बळींपैकी १२ हे डावखुरे आहेत. त्याने संगकाराला चार वेळा तर थिरिमानेला तिनदा बाद केले आहे. मिश्राचा लेग-स्पिन मारासुद्धा श्रीलंकेला सतावतो आहे. मिश्राचे १२ पैकी ७ बळी हे तळाचे फलंदाज आहेत.
पहिले दोन कसोटी सामने निर्णायक ठरल्यामुळे तिसरीसुद्धा निकाली ठरण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने ही कसोटी गमावल्यास सलग दुसरी मालिका ते पराभूत होतील. पाकिस्तानविरुद्धची मालिका त्यांनी १-२ अशी गमावली आहे. त्यामुळेच किमान कसोटी अनिर्णीत जरी राहिली तरी, ही नामुष्की त्यांना टाळता येईल.

गेल्या काही वर्षांत मी पाहिलेली सर्वोत्तम भारतीय गोलंदाजांची कामगिरी, असे मी दुसऱ्या कसोटीचे वर्णन करीन. प्रतिस्पर्धी फलंदाज बाद व्हायला लागल्यावर त्यांनी ते दडपण कायम ठेवले. भारतीय गोलंदाज तिसऱ्या कसोटीतही त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील.
-रवी शास्त्री, भारताचे संघ संचालक

कुमार संगकाराच्या निवृत्तीनंतर त्याच्याइतके कसोटी सामने खेळलेला कोणताही खेळाडू संघात नाही. त्याचे रिक्त झालेले स्थान भरायला, बराच अवधी लागेल. डावखुरा फलंदाज उपूल थरंगा हा निश्चितपणे संगकाराच्या तिसऱ्या स्थानासाठी दावा करू शकतो.
-अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार

संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, नमन ओझा, करुण नायर, रवीचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लहिरू थिरिमाने, कौशल सिल्व्हा, दिम्युत करुणारत्ने, दिनेश चंडिमल, उपूल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगना हेराथ, दिलरूवान परेरा, थरिंदू कौशल, न्यूवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नाडो, दुश्मंता चमीरा.
सामन्याची वेळ : सकाळी १० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.