भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंह धोनी हा सध्याच्या संघातला सर्वात मौल्यवान खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. माझ्या मते धोनी हा अजुनही जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, त्यामुळे सध्याच्या घडीला धोनीची संघातील जागा अबाधित असल्याचे संकेत शास्त्री यांनी दिले आहेत. मध्यंतरी धोनीच्या खालावलेल्या कामगिरीवरुन त्याला संघातून विश्रांती देण्याची गरज असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं. मात्र त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात आपल्या कामगिरीने धोनीने सर्वांची तोंड बंद केली.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्रींनी महेंद्रसिंह धोनीचं तोंडभरुन कौतुक केलं. “माझ्यासाठी धोनी हा जगातला सर्वात चपळ आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन केवळ वन-डे सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणं त्याच्यासाठी फायदेशीर ठरतंय. संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनी सध्या सर्वात सिनीअर खेळाडू आहे”, त्यामुळे त्याचं संघात असणं हे अत्यंत गरजेचं असल्याचंही शास्त्री म्हणाले.

रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विश्रांती दिल्याबद्दल शास्त्रींनी आपली बाजू स्पष्ट केली. “यापुढे भारतीय संघाचा देशातील आणि परदेशातील दौऱ्यांचा व्यस्त कार्यक्रम पाहता, दोन्ही खेळाडूंना विश्रांती मिळणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक सामन्यात आश्विन आणि जाडेजाला मैदानात उतरवु शकत नाही. यापुढे भारताला श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध कसोटी मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे मोठ्या दौऱ्यांसाठी आश्विन आणि जाडेजाला राखून ठेवण्यात आल्याचं शास्त्रींनी स्पष्ट केलं.

मध्यंतरी काही माजी खेळाडूंनी २०१९ साठी संघाची निवड करताना धोनीच्या जागेला पर्याय शोधणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनीही २०१९ साठी धोनी हा आपल्यासमोरील एकमेव पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता प्रशिक्षकांनीच दिलेल्या तोंडभरून कौतुक केल्यामुळे धोनीची पुढील काही काळासाठी संघातली जागा आता पक्की मानली जात आहे.