पहिल्या सामन्यात साकारलेल्या विजयाची घोडदौड पुढे राखण्यात भारतीय महिला संघाला अपयश आले. दुसऱ्या एकदिवसीय लढतीत न्यूझीलंडने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवामुळे २०१७च्या विश्वचषक पात्रतेसाठीचे महत्त्वाचे गुण भारताने गमावले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचे १६४ धावांचे आव्हान सुझी बेट्सच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने ४४.२ षटकांत गाठले आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने बळी मिळवत न्यूझीलंडवर अंकुश ठेवला; परंतु सोफी डीव्हाइन (३३) आणि कॅटी पर्किन्स (३०) यांनी पाचव्या विकेट्साठी ४९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर लीघ कॅप्सीरीक (१७ नाबाद) आणि अ‍ॅना पीटरसन (२३ नाबाद) यांनी आठव्या विकेटसाठी उभारलेली नाबाद ३२ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. झुलन गोस्वामी, एकता बिश्त आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याआधी, थिरुश कामिनीच्या ६१ धावांच्या दमदार खेळीच्या बळावर मिथाली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ४९.३ षटकांत १६३ धावा केल्या. उभय संघांमधील तिसरी लढत ३ जुलला होणार आहे.

संक्षिप्त धावफलक
भारत : ४९.३ षटकांत सर्व बाद १६३ (थिरुश कामिनी ६१, हरमनप्रीत कौर ३१; सुझी बेट्स ३/२१) पराभूत वि. न्यूझीलंड : ४४.२ षटकांत ७ बाद १६४ (सोफी डीव्हाइन ३३, कॅटी पर्किन्स ३०; झुलन गोस्वामी २/१४, एकता बिश्त २/३१)