चॅम्पियन्स चषक स्पध्रेसाठी संघ जाहीर; सरदार सिंग, रूपिंदर पाल सिंग यांना विश्रांती

कुशल कर्णधार सरदार सिंग आणि निपुण ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग यांना पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पध्रेतून विश्रांती देण्यात आली आहे. १० ते १७ जून या कालावधीत लंडन येथे होणाऱ्या या स्पध्रेकरिता मंगळवारी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पध्रेत भारताचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

सरदार आणि रूपिंदर यांच्यासह रमणदीप सिंग आणि जसजीत सिंग कुलर यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. वरिष्ठ खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. चॅम्पियन्स चषक स्पध्रेनंतर भारत सहा देशांचा सहभाग असलेल्या स्पध्रेत खेळणार आहे.

‘‘सरदार आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना चॅम्पियन्स चषक स्पध्रेत विश्रांती देण्याचा निर्णय आधीच ठरला होता. गेली दोन वष्रे हे खेळाडू सतत खेळत आहेत आणि ऑलिम्पिकपूर्वी त्यांना विश्रांती देणे गरजेचे होते. अझलन शाह चषक स्पध्रेतही आम्ही हीच रणनीती वापरत श्रीजेश आणि व्ही. आर. रघुनाथ यांना विश्रांती दिली होती,’’ अशी माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष निरदर बत्रा यांनी दिली.

आक्रमकपटू एस. व्ही. सुनील उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. सरदारच्या जागी संघात युवा खेळाडू प्रदीप मोर याला संधी मिळाली आहे, तर मध्यरक्षक देविंदर वाल्मीकीनेही संघात जागा मिळवली आहे. आघाडीपटूंमध्ये रमणदीप सिंगच्या जागी आकाशदीप सिंगला स्थान मिळाले आहे. अझलन शाह चषक स्पध्रेत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत सिंगला कायम ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघ : पी. आर. श्रीजेश (कर्णधार), विकास दाहिया, प्रदीप मोर, व्ही. आर. रघुनाथ, कोथाजित सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, दानिष मुज्ताबा, चिंगलेसाना सिंग, मनप्रीत सिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मिकी, हरजित सिंग, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, एस. व्ही. सुनील (उपकर्णधार), आकाशदीप सिंग, निक्कीन थिम्माईआह.

चॅम्पियन्स चषक स्पध्रेत दमदार कामगिरी करण्याचे आणि अव्वल स्थानापर्यंत मजल मारण्याचे आमचे ध्येय आहे. पदकाने स्पध्रेची सांगता करण्यात यशस्वी झाल्यास आमच्या ऑलिम्पिक तयारीला प्रेरणा मिळेल.

– पी. आर. श्रीजेश

केवळ विजय मिळवणे हे लक्ष्य नसून आखलेल्या रणनितीची योग्य अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनाने आम्ही स्पध्रेत उतरणार आहोत. याचा रिओमध्ये संघाला मानसिक, शारीरिक आणि तांत्रिक फायदा होणार आहे.

– रोलँट ओल्टमन्स, प्रशिक्षक